Thursday 2 March 2023

आंब्याचा बंगला

 

आंब्याचा बंगला

                    ते आंब्याचं झाडच वेगळं होतं. हापूस, पायरी, केशर,बदाम, ---- अशा कुठल्याच खानदानी आंब्यांची मोहोर त्यावर उमटली नव्हती. त्यामुळे फार नजरा त्याच्याकडे रोखल्या जाणार नव्हत्या किंवा कोणाची नजरही त्याला लागणार नव्हती. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असा साग्रसंगित  पाळण्याचा खड्डा खतामातीच्या मऊमऊ दुपट्याने सजवून, पाण्याने ओलावून पिशवीतल्या छोट्या खानदानी रोपट्याला जो बारशाचा सोहळा अनुभवायला मिळतो; त्याच्या नावाचं लेबल त्याच्या गळ्यात जिवती सारखं बांधलं जातं; अमक्या अमक्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते लावलं गेल्याची दिमाखात त्याच्या जन्माची नोंद तेथे दगडावर कोरली जाते; असा काही जन्मोत्सव वगैरे ह्याच्या वाट्याला नक्कीच आला नसणार.

                  कधीकाळी रायवळ बियवळ अशी साधारण कोय पक्ष्या-माणसाकडून अनाहूतपणे पडल्यानी त्याचा जन्म झाला होता. चंद्रप्रकाश जसा दरिद्री आणि श्रीमंत असा भेद करत नाही तसा पावसाने, सूर्याने कुठला भेद न करता त्याला भरभरून दान दिलं, त्याने घेतलं आणि  नागपूरला थेट आमच्या बेडरूमला लागून त्याने त्याचा बंगला थाटला. बाकीच्या दशहरी, लंगडा अशा लावलेल्या रोपांना मोकळी ढाकळी जागा, पाण्याचा पाट, खताची पिशवी वेळेवर मिळायची. ह्याची काहीच तक्रार नव्हती पण त्याचं ते निसर्गासोबत आतून आतून फुलणं , दरवर्षी पानांचा अजून एक मजला चढवणं मी बघतच रहायचे.

                     वसंतपंचमीच्या आधीपासूनच त्याच्यावर मोहोराची , सुगंधाची रेलचेल सुरू व्हायची. असंख्य किडे, मधमाशा, भुंगे झाडाला घेरून टाकत. शेकडो हजारो कैर्‍यांनी  तो विस्तीर्ण वृक्ष भरून जाई. मुलं सकाळी फिरून आली की उंच उडी मारून कैर्‍या तोडत. तिखटमिठाबरोबर ती आंबट कैरी खातांना एक डोळा मिटला गेला तरी मज्जा येई. खारी पोपट यांनी तर सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्याच्यावरच मुक्काम टाकला.

                 पावसाने इतर झाडांचा मोहोर गळाला तरी ह्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही. उलट अजूनच गम्मत झाली.  ह्या वृक्षाच खोड 15-20 फुट सरळ वाढून मग तेथून त्याला तिन चार फांद्या फुटल्या होत्या. त्यामुळे सहाजिक एक घमेल्याच्या आकाराचा खड्डा  तेथे तयार झाला होता जो खालून दिसत नसे. पाऊस पडल्यावर फांद्यांवरून ओघळून येणारं पाणी ह्या खड्यात साठल्याचंही आमच्या लक्षात आलं नाही. एक दिवस एक सुतार पक्षी आनंदानी त्यात पंख फडफडवून अंघोळ करतांना दिसला. थोडसं झाडावर चढायचं परत पाण्यात फडफड करत पंख हलवायचे. त्याच्या ह्या टबबाथनी आम्हीच आनंदून गेलो. झाडानी तयार केलेल्या ह्या टबमधे अनेक पक्षी जलविहार करायचे.

                  मिळतील तेवढ्या, पडतील तेवढ्या सर्व कैर्‍यां उकडून मी त्याच्या गरात गुळमीठ घालून घट्ट पन्हे बनवून बरण्या बरण्या भरभरून फ्रिजर सजवले. जमतील तेवढी विवध प्रकारची लोणची, रायती पानात सजवली.

                त्या झाडाचा तो आनंद सोहळा काही वेगळाच होता -

 

फांद्यांवर फांद्या फांद्यांवर फांद्या

आंब्याने बांधला सात मजली इमला

 

हिरव्या हिरव्या पानांची घातली छान कौलं

पिवळ्या केशरी आंब्याची जागोजागी झुंबरं

 

पायापाशी घातली मोहोराची रांगोळी

स्वागताची तयारी जय्यत खाशी केली

 

भिंतींवर चितारली फुलांची चित्रं

वार्‍यासंगे धाडली निमंत्रणाची पत्रं

 

बोलावलं सार्‍यांना त्याने आवर्जून

झाडाचा बंगला गेला गजबजून

 

मधाच्या देशातून आली मधुराणी

रंगांच्या देशातुन फुलपाखरे आली

 

गाण्याच्या देशातून कोकीळा आली

बुलबुलला ही सोबत घेऊन आली

 

पाचूंच्या बेटातून पोपट पाचूंचे आले

लालचुटुक माणकांचे कंठे लेऊन आले

 

सोनेरी जाकिटात भारद्वाजही आले

नीलमणी पिसार्‍यात मोर ऐटित आले

 

हळद्या मुनिया सारेजण आले

हुप हुप करीत वानर ही आले

 

लगबग लगबग खारुताई आली

वर खाली खाली वर किती धांदल तिची

 

अजुन किती आले सुंदर सुंदर पक्षी

वेडा राघू आणि किती मधभक्षी

 

माशा आणि सुरवंट ते ही आले

झाडाने त्यांनाही कडेवर घेतले

 

झाडाने सार्‍यांचे स्वागत जंगी केले

फुलांच्या पेल्यांतून मध देऊ केले

 

महिना दोन महिने चालू होत्या पंक्ति

आंबट चिंबट कैऱया अन् मधुर आंबे चाखती

 

पानापानातून खेळवला गार गार वारा

सर्वांना आवडला वातानुकूलित बंगला

 

फांद्या जिथे होत्या खोडाला मिळाल्या

तिथे त्यांनी खड्डा तलावासाठी केला

 

झाडाच्या फाद्यांवरून ओघळलेला पाऊस

साठवून पुरवली पोहायची हौस

 

खंड्या आणि सुतारानी मारले सूर

आळस कंटाळा त्यांचा पळाला दूर

 

सर्वांनी केली झाडावर वस्ती

इवली इवली घरटी सुबक सुंदर बांधली

 

मधमाशांनी बांधलं झाडाला पोळं

षट्कोनी मेणाच्या फरशांचं चांगलं

 

गोल गोल वाटीसारखं बुलबुलचं घरटं

आंब्याच्या डहाळीवर झुलणारं छोटं

 

 

काटक्या कुटक्यांच घरटं कावळ्यानी केलं

कोकीळेनी त्याच्यातच बाळ आपलं ठेवलं

 

कुंभारणीनी बांधलं मातीच घर

ढोली बनवुन झाडात सुताराचं पोर

 

सर्वांनी केली खूप खूप धमाल

तानांवर ताना केली कमाल

 

मैना बुलबुल अन् कोकीळ दयाळ

तानांवर तानांची लागली माळ

 

पोपट आणि सातभाईंनी किलबिलाट खूप केला

झाडाला त्यांचाही कंटाळा नाही आला

 

झाडाच्या कानात काळेभोर भुंगे

``खूप सुंदर दिसतोस'' असं हळुच म्हणाले

 

वेडं वेडं झाड माझं खुदकन् हसलं

त्याच हसू माझ्या मनात खोलवरं रुजलं

-----------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment