Thursday 2 March 2023

शेवंती –

 

शेवंती –

माझ्या आईबाबूजींच्या घरासमोरच ग्रामदेवतेचं मंदिर होतं. गणपती गावी जायला निघतात न निघतात तोच नवरात्रीची गडबड सुरू होई. मंदिरासमोर पन्नासएक बांगड्यांच्या दुकानांचे मांडव पडत.  चमकदार वर्खाच्या काचेच्या बांगड्या म्हणजे स्त्रीजगताला पर्वणी असे. ही रंगिबेरंगी सजलेली दुकानं, ओटीचं सामान, हळदीकुंकु, नारळ, साखरफुटाणे ह्यांच्या दुकानांच्या जोडीने रस्त्यावर फुलांचे वाटे मांडून बसलेली मुलं, बायका पुरूष ह्याची गर्दी असे. फुलं फक्त दोनच प्रकारची— हळदीच्या रंगाकडे झुकणारी तिळाची पिवळी आणि लिंबाच्या रंगाकडे झुकणारी शेवंतीचीही जास्त करून पिवळीच. काही ठिकाणी शेवंतीची पांढरी फुलंही असायची. काही फुलवाल्या शेवंतीच्या वेण्या गुंफत बसलेल्या असत. एक समिश्र वास सार्‍या आसमंतात भरून राहिलेला असे. तो वास आणि नवरात्र ह्यांचं माझ्यासाठी एक अतूट नातं होतं. कुठल्याशा अनामिक अदृश्य चैतन्याचा वावर त्या परिसरात असे. त्या वासातही नासिकेला जागृत करणारा शेवंतीचा उग्र वास लपत नसे. पहाटे पहाटे फटफटत असतांनाच देवीला भाविकांच्या रांगा लागत. ते सगळं भारलेलं वातावरण मला शेवंतीच्या वासाशी आजही जोडतं. किंवा शेवंती मला परत त्या वातावरणात हात धरून घेऊन जाते.

काळ्या कपड्यांवर कवड्यांच्या माळा घातलेले, कपाळावर हळदिकुंकवाचा मळवट भरलेले भुतेही काहीतरी म्हणत असायचे. कदाचित देवीचं गुणगान असेल कदाचित ह्या शेवंतीची महतीही असेल----- काय माहित? ---!!!

शेवंती -

16;10

नवरात्रीचा हात धरुनिया आली शेवंती

फुले हासरी आनंदाने झाडावर डुलती

सूर्याचे जणु रूप घेऊनी लखलख सोनेरी

किरणांच्या पाकळ्या मनोहर दाहि दिशि फाकती

 

शरदऋतूची राणी सजली कनकफुले माळुनि

उत्साहाचा मंत्र देतसे मना संजीवनी

उठा उठा हो दिवा चेतवा चैतन्याचा हृदि

दुर्गुणरूपी महिषासुर हा असे मातलाची

 

विवेकदीपा घेऊन हाती पहा नीट त्यासी

असे घेरिले पुरते त्याने; सुटका हो कैची

निग्रह रूपी तीक्ष्ण त्रिशूळा घट्ट धरुन हाती

कंठनाल भेदून तयाचा विजया-दशमि करी

 

 फूल एक मी लहानसे जरी उगवे कोठेही

रणी निरखते लव थांबोनी माय भवानीही

मजला केसामधे माळते महिषासुरमर्दिनि

पदी तिच्या हो असेचि अर्पण देहसुमन हेची

-------------------------------------

लेखणी अरुंधतीची –

 

 

 

No comments:

Post a Comment