Thursday 2 March 2023

शाल्मली

 

 

शाल्मली

वार्‍याचा एक झोत खिडकीतून वेगाने आत आला. त्यासोबत शाल्मलीच्या(काटेसावर) फुटलेल्या बोंडातून निसटलेली एक पांढरीशुभ्र भलीमोठ्ठी म्हातारी अलगद माझ्या हातावर येऊन बसली. तिचे ते नाजुक रेशिम तंतु चमकत होते. खाली रेघेप्रमाणे एक छोटंसं बीज पॅरा ग्लायडर प्रमाणे त्या इवल्या पॅरॅशूटच्या दोर्‍या पकडून होतं  नुसत्या माझ्या उच्छावासानेही ते तंतु कंप पावत होते. हलकेच हात ओठासमोर धरून फूऽऽऽऽ करत एक अलगद फुंकर तिच्यावर मारताच ती हवाई छत्री, तो मुलयम रेशिम कशिदा हवेवर तरंगत तरंगत परत एकदा खिडकीतून पार झाला. तो क्षणभराचा आनंद मनात शाल्मलीचा जीवनपट उघडून गेला. 

वसंतात बहरते शाल्मली । लालचुटुक ती फुले उमलती

अगणित अगणित बाल रवी का । फांद्या फांद्यांवर ते डुलती


आग लागली वनात का ती । ज्वाळा लालेलाल वाटती

रविबाळे ही परी गोजिरी । वनात सार्‍या उठून दिसती


ग्रीष्म जरा माथ्यावर येता । असे घालिती सुंदर कपडे

हिरवागारचि तनु बुंधा तो । लटकन लटकत हिरवी बोंडे

 

राजस्थानी जणू नर्तिका । नर्तन करते झुलवित गोंडे

हात पसरुनी पदन्यास तो । जिकडे तिकडे डुलती गोंडे

 

जरा वाढता हवेत उष्मा । तडकति बोंडे होय करीष्मा

उडे चहुकडे मउ मउ कापुस । पक्ष्यांनाही तीच प्रतीक्षा

 

रेशिमधागे अधांतरी ते । तरंगती वार्‍यावर हलके

पकडू म्हणता निसटून जाती । अलगद खांद्यावर ते बसती

 

तळहाती अलवार ठेउनी । फुंक एक हळुवार मारुनी

तरंगत्या छत्रीस हवाई  । पुन्हा देतसे गती हळू मी

 

आनंदाचा क्षण तो क्षणभर । झोके घेई मन वार्‍यावर

तरंगणारा रेशिम कशिदा । पवन नेतसे पुन्हा दूरवर

--------------------------------------------------

 

लेखणी अरुंधतीची

7 जून 2020

No comments:

Post a Comment