दीपमाळ
अहो
जाहला देह हा दीपमाळ
उभा
राउळाच्या पुढे सर्वकाळ
जना
दावितो वाट ही राउळाची
सदा
भक्तितेजात तेजाळलेली ।। 1
पहा
तेवती लक्ष ह्या सांजवाती
प्रभेनेच
ओथंबल्या दाट राती
बघे हा
दुरूनी मला भक्तवृन्द
भरूनीच
येई तयांचेच चित्त ।। 2
पटे
राउळाची मनी खूणगाठ
तयांचेच
ओलावती नेत्रकाठ
“जरी पाय
भेगाळले चालुनी हे
तरी लागले सार्थकी चालणे हे” ।। 3
“अबीरा-समा
वाटते आज धूळ”
बघोनी
म्हणे भक्त , ही दीपमाळ
“करांनी
जुळावे अपोआप आज
असा
श्रीहरी दर्शनाचा सुयोग” ।। 4
श्रुती बोल हे ऐकुनी धन्य होत
सुखावून मी होतसे नित्य तृप्त
असे माखता पायधूलीत अंग
मला
लाभतो नित्य श्रीरंगसंग ।। 5
जरी
पाहिले ना तुझ्या श्रीमुखासी
भरूनीच
डोळे प्रभो एकदाही
सदा
सर्वदा हे उभे राहणेही
मला
मान्य रे राउळीच्या समोरी ।। 6
-----------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
No comments:
Post a Comment