Monday 20 March 2023

बेशरमी

 

बेशरमी  

                    नगरला बदली झाली होती प्रवीण दीक्षितांची. आमचाही नुकता नुकता संसार सुरू झाला होता.  1981 ह्या वर्षी नगरला पहिले Additional S.P.   होण्याचा मान प्रवीण दीक्षितांना मिळाला कारण, नगरला  Additional S.P. ची पोस्टही नव्याने करण्यात आली होती. त्यामुळे बाकी पोस्टसाठी जशी राखीव अशी ठराविक घरं असतात तसं त्या पोस्टसाठी विशिष्ट घर नव्हतं. शोधाशोध करत रिकाम्या बंगल्यांपैकी एक ऐसपैस बंगला आम्ही निवडला. ओसाड असला तरी थोड्याफार डागडुजीने  राहण्यास चांगला होणार होता.  बंगल्याबाहेर असलेल्या प्रचंड आवारात अधुन मधून जांभळ्या फुलांची झुडपं अंगोपांग फुलली होती. ओसाडीपेक्षा बरी वाटली डोळ्याला. तेवढीच डोळ्यांना सुखावणारी हिरवाई आणि जांभळी फुलराई!

                   दुसर्‍या दिवशी बंगला पहायला गेलो तेंव्हा डागडुजी सुरू झाली होती. माळी येऊन बाहेरच्या आवारातील सर्व फुलांनी गच्च भरलेली झाडं  मूळापासून खणून काढत होता. बहुतेक झुडपं काढूनही झाली होती. `` अरेरे कशाला काढली ती!’’ न राहवून मी म्हणाले. त्यावर सगळे मलाच हसत म्हणाले, ``वहिनीबाय ती झाडं बेशरमीची होती. ती अशी घरात लावत नाहीत. ती गावाबाहेरच्या उकिरड्यावरची झाडं आहेत.’’ पूर्वी माणसाच्या काही जातींना वेशीबाहेर रहावे लागे. आता माणसांसोबत झाडांचीही हाकालपट्टी गावाबाहेर व्हावी? माणसांप्रमाणे झाडांनासुद्धा जाती जमाती असतात की काय? त्यांना सुद्धा वेशीबाहेर राहण्याची सोय करावी? उगीचच मनातल्या मनात मला राग आला. नंतर अनेकवेळा गाव संपलं की खरोखरच वेशीबाहेर उकिरड्यावर, दलदलीत उगवलेली अगोपांग जांभळ्या फुलांनी बहरलेली ही झाडं पाहिली की त्यांचं बेशरमी हे नावं मनाला डाचत असे. ह्या वनस्पतीला चांगलं नावं पाहिजे होतं. तिच्यावर अन्याय होतोय असं सारखं मनात येई मग वाटे ,

 

ती जरा आली फुलावर

तो घाव पडला मुळावर

घरच्या बगिचातून तिची

हकालपट्टी उकिरड्यावर

 

गावाबाहेर दलदलीवर

तरी वाढली भराभर

साधं फुलण्याच स्वप्न तिचं

मनी रुजलं होतं खोलवर

 

बहरणं तिचं अनावर

जाणार्‍याच्या नजरेवर

अधाशी नजरा तिला

डसत होत्या अंगभर

 

काटेरी जिभा तिला

ओरखाडत मनावर

तरी गावाची घाण झाकीत

बेशरमी फुलली अंगभर

फक्त- --- साधं फुलण्याच स्वप्न तिचं

साकारलं ------ पण? उकिरड्यावर!

 

----------------------------------------

  

             नंतर काही दिवसांनी बेशरमीचा पराक्रम कळला. आदिवासी भागात काम करणारी एक मैत्रिण तिचा अनुभव सांगत होती. तिला तिथल्या आदिवासी मुलीनी सांगितलेला,---

``बेशरमी ही फार विषारी वनस्पती आहे. तिच्या पानात गुंडाळून मासा तळला तर तो मासाही विषारी होतो. माणूस मरतो त्याने. पण त्या विषाने माशाची चव बदलत नाही.’’

मैत्रिण म्हणाली ``पण मग बेशरमीच्या पानात मासा तळायचाच कशाला ना?’’

 त्यावर निरागसपणे ती मुलगी उत्तरली, ``कधी कधी नवरा दारू पिऊन फार छळतो, कधी कधी दुसर्‍याच मुलीच्या प्रेमात पडतो किंवा कधी कधी आपल्यालाच दुसरा कोणी आवडतो -----!!!!! ’’

एकंदर बेशरमीचं नावं बदलावं असं परत कधी वाटलं नाही.

--------------------------------

 

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment