Thursday 2 March 2023

सांब सदाशिव

 

सांब सदाशिव


स्वेदगंगा वाहते नित   कष्टणार्‍या देहांवरी

मंथिता संसार सागर   कालकूटचि आले करी।।

प्राशितो जहाल जहरही परि देतो कोणासही

ठेवितो रोधून कंठी ये मुखी जाई उरी ।।

प्रतिपदेची कोर इवली आशारुपी धरली शिरी

ती उतारा ह्या विषाला सान असली तरिही खरी ।।

जन-जिभांचे हे विखारी सर्प रुळती अंगावरी

 चिता जाळुन कामनांची   भस्म लावी अंगावरी।।

जनापवाद यज्ञामधे   जळुन जन्मे राखेतुनी

मारूप मनिची उमेद   ती शिवाची अर्धांगिनी

बोचताती थंड नजरा   प्रेम करुणा जिथ गोठली

कैलास निर्दय पाहुनी  बसे निर्मम हा त्यावरी ।।

समाज-नंदि माजताचि स्वार होई त्याच्यावरी

घालून त्या घट्ट वेसण । हा आणितो वठणीवरी।।

संहारुनी जाचक रुढी रुंडमाळा मिरवी उरी

कालद्रष्टा दूरदर्शी   नेत्र तिसरा भाळावरी ।।

कातडे ओढून नयनी दृष्टिआड अन्याय जनी

डोळ्यांस करुनी नागवे तेचि चर्मांबर पांघरी ।।

त्रिशूळ धरुन हाती कसा हा स्वस्थ चित्तचि बैसला

नेत्र अर्धोन्मीलित ह्याचे का आत्मचिंतन जनहिता।।

शब्द जो उमटे मुखातुन डंकार तोची डमरुचा

जागवी खडबडुनी पुन्हा    समाज स्वस्थ जो झोपला।।

त्रिनेत्र तोचि विस्फारिता  माजे हलकल्लोळ महा

त्राहि त्राहि दुष्ट म्हणती सांब सदाशिवचि जागला ।।

क्रोध याचा तो भयंकर गर्भगळितचि सारे जगी

होत निप्पातचि खलांचा ऐसेचि तांडव भयसुरी।।

जाहला मग शांत शिव तो । नेत्र मिटुनी पद्मासनी

भरुन उरे सांब सदाशिव । घोष सार्‍या हृदयातुनी ।।

----------------

 

 

No comments:

Post a Comment