Thursday, 30 March 2023

कांसपठार -

 

कांसपठार -


मित्रांनो! एखादी दुसर्‍या भाषेतील कलाकृती आपल्या भाषेत आणतांना काय translate करावं? ---- शब्द?---- कडवी? --मध्यवर्ती कल्पना ? का कवितेचा आत्मा? कलाकृती ज्या मातीत रुजलेली असते तेथील रंग, गंध आणि आसमंत बरोबर घेऊन उभी असते. ती आपल्याकडील मातीत रुजवतांना ती फुलली पाहिजे. आपल्याकडचा आसमंत तिने स्वीकारला पाहिजे.

रामासोबत विवाह करून आलेल्या सीतेला बघण्यासाठी आयोध्येत रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. हीच वेळ असते नाकारण्याची वा स्वीकारण्याची. सुभद्रेशी विवाह करून येणार्‍या अर्जुनाला प्रश्न पडला होता की द्रौपदी हिला कशी स्वीकारेल? अशा वेळी गवळणीचा वेश करून श्रीकृष्णाची बहीण म्हणून ती एकटी द्रौपदीला भेटायला गेली तेव्हा द्रौपदीने तिला सहज स्वीकारलं. तशी लोकांसमोर गेलेली आपली कलाकृती स्वीकारणार का नाकारणार हे त्या कलाकृतीच्या प्रवेशातच ठरतं.

नाहीतर सर्प यज्ञाच्या कुंडात ‘‘तक्षकाय स्वाहा!’’ म्हटल्यावर इंद्राच्या सिंहासनाचा भक्कम आधार मिळालेल्या तक्षकाला, ‘‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’’ म्हणत जनमेजयानी खेचून खाली आणलं. त्याप्रमाणे दुसर्‍या कलाकृतीला त्याच्या रसगंध आसमंतासह खेचून आणून विजयी वीराप्रमाणे त्या कलाकृतीला ज्या ताकदीने आपल्या भाषेत आणलं असेल; ते पाहूनच वाचकांनी वहाव्वा करावी!

माझा आपला साधासा प्रयोग! दुसर्‍या भाषेतील कलाकृतीला आपल्या मातीत, आपल्या आसमंतात रुजवायचा. कडव्याला कडवं ओळीला ओळ असा कुठलाही नियम न पाळता !

 

स्वच्छंद विहरतो, आकाशातुन । मेघ धवल तो जसा

मनमुक्तपणे मी, तसा एकदा । फिरलो दाही दिशा

 

ओठात शीळ मम, साद घालते । रानपाखरासवे

बहु गिरीकंदरा, पार करित मी । रानवाट अनुसरे

 

'चढ' चढता चढता , नेत्रांपुढती । साकारले पठार

उलगडतचि गेला, पुष्प गालिचा । त्यावरती अलवार

 

चैतन्यमयी तो, रानफुलांचा । भव्य गालिचा हसे

ते अबलख न्यारे, रंग फुलांचे । जणु इंद्रधनु विलसे

 

वार्‍याने त्यावर उठती लहरी । सरसरसर धावती

टेकवी फुले शिर, शेजार्‍यांच्या । खांद्याफांद्यांवरी

 

कधि रेलत चुंबत, झुलतचि अलगद । पुष्प ताटवा वनी

जणु इंद्राचे का, नंदनवन हे । वाटे ऐसे मनी

 

ते नृत्यनाट्य मी, बघत राहिलो । विसरुन सारे भान

हृदि आनंदाचे, तरंग उठती । मन जाय मोहरून

 

हातात हात घालून वायुच्या । परिमल फिरेचि स्वैर

मम हृदयमंदिरी प्रवेशता तो । मम हृदय सैरभैर

 

मम हृदयकुपीतचि, आजही आहे । सुगंध ताजा तोच

ह्या मनपटलावर, चित्र रेखले । रंगही ओले तेच

 

किलकिले करीता, आठवणींचे । झाकण मिळता वेळ

तो पुष्पगालिचा सुगंध उधळत, । उलगडत जाय काळ

----------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Friday, 24 March 2023

माझी मराठी

 

माझी मराठी

 

वार्तालाप करेन नित्य मधुरा मी मायबोलीमधे

माते स्तन्यचि अमृतासम तुझे वाणीस चैतन्य दे

जेथे जन्मचि घेतला जननि मी मातीत ज्या येथल्या

आली पावन संस्कृती रुजुन जी ती धन्य वाटे मला ।। 1

 

झाली जागृत अस्मिता मम मनी ह्या मायबोलीमुळे

सांगे थोर परंपराच मजसी त्या शौर्य धैर्यासवे

त्यागाच्याच कथा विलक्षण महा त्या पूर्वजांच्या भल्या

येई चित्त उचंबळून मम हे मी ऐकता त्या व्यथा ।। 2

 

केले काय न काय काय जननी मोठे कराया मला

ज्ञानाचा खजिना अमोघ दिधला ह्या अज्ञ बाळा तुझ्या

``सारे विश्व असेचि हे घर तुझे’’ दे आत्मविश्वास हा

``पादाक्रांत करे धरा सकल ही’’ विश्वास हाची दिला ।। 3

 

समृद्धी मजला अपार दिधली माते तुझा मी ऋणी

भाषानंदनकाननी द्विजच मी गातो स्तुती तोषुनी

ह्या विश्वात कुठे कुठे फिरत मी ओठी तुझे गीत गे

चित्ती हे ठसलेच वैभव महा वाणी मराठी तुझे ।। 4

--------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

हे राष्ट्रदेवते भारतमाते

 

हे राष्ट्रदेवते भारतमाते

हे राष्ट्रदेवते भारतमाते

चैतन्य प्राण तू वसुंधरेचे

तू अमृत देसी जगास अवघ्या

जरि कालकूट तव नशिबी आले -------

 

संसार दुःख जे अचूक भेदे

जे संकट-सागर पार करविते

तू अमोघ गीता- कर्मशस्त्र ते

देऊन जगता बहु कृतार्थ केले -------

 

कर्तव्य पथावर अढळ राहिले

जे अधर्मासवे नित्य झुंझले

आदर्श स्थापिले श्रीरामकृष्ण ते

नित मानबिंदु जे सद्धर्माचे-------

 

 

दे सामान्यासी असामान्यपण

जे नीतीचे नवनीत खरोखर

रणनीतीचा जो अपार सागर

 पंचतंत्र देसी ते बहु दुर्लभ-------  

 

  तव शिल्प शास्त्र वा शल्य शास्त्र वा

वा शास्त्र रसायन अमूल्य ठेवा

योगाचा दिधलास वारसा

तू विज्ञानाचा दीप प्रखरसा-------

 

 

तू वसुंधरेचे हृदयस्थान गे

तव स्थान कुणी का घेऊ शकते?

जरी जाळीले तुज यवनांनी त्या

तव सुवर्णकांती तरिही झळके-------

 

तू जगता शिंपुन प्राण रसाने

करिसी सरसोत्सव जगती माते

तव गत वैभव गे पुन्हा मिळवुनी

जगद्गुरूच्या तुज बसवू स्थानी -------

 

-------------------------------------------

सौ. अरुंधती दीक्षित -

भारत गौरवगान

 

भारत गौरवगान

(फटक्याच्या चालीवर ---)

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

परी पसरला आज प्रकाश

भारत व्हावा विश्वगुरू ही

भारतीयांना लागे आस ।। 1

 

कृषी असो वाणिज्य असो वा

उद्योगाची धरुनी कास

आत्मनिर्भरचि होऊ आम्ही

तडीस नेऊ निश्चय खास ।। 2

 

क्षेत्र असू दे कुठलेही ते

मनी लागुनी एकच ध्यास

आत्मसात करु नवीन तंत्रे

पार कराया संकट-रास ।। 3

 

प्रगतीचा चौफेर उधळला

वारू हा घेऊन विकास

वंचित शोषित सुखावले हृदि

आशेचा पाहून प्रकाश ।। 4

 

स्वच्छ निरामय झाले जीवन

गाव मोकळा घेई श्वास

डोक्यावरती छत्र घराचे

आज मिळे गरिबास खुशाल ।। 5

 

तरुणी बघती स्वप्न नभाचे

उद्योजक हे तरुण महान

विश्वाला देतीच दिलासा

 सुखमय जीवन देउ तुम्हास ।। 6

 

आयुर्वेदाची योगाची

महती कळली आज जगास

विश्व शांती अन विश्वसुखाविण

नसे दुजा पर्याय जगास ।। 7

 

उपेक्षितांच्यास्तव जे जगले

दिधला त्यांसी दृढ आधार

अशा प्रसिद्धीपराङ्मुखांना

सन्मानित केले साभार ।। 8

 

मार्ग मार्गिका प्रशस्त झाल्या

देशाचा करण्यास विकास

जोडत जाती `भारत-भूला

सागरमाला सहज प्रवास ।। 9

 

नव्हती जेथे पायवाटही

धावपट्टि वर तिथे विमान

सीमेवरती धावु लागले

झेपावे सहजीच नभात ।। 10

 

एकदिलाने उभेचि राहू

घरभेद्यांवर करुनी मात

जागृत झाली आज अस्मिता

इतिहासाची मिळता साथ ।। 11

 

अत्याचाराखाली दबल्या

मनांस फुटले अंकुर आज

विश्वासाचे अन धैर्याचे

 कोंब तरारुन आले आज ।। 12

 

परकीयांच्या भयबंधाने

बांधियले होतेची  हात

चला उडू या जाळे घेऊन

ज्यात अडकले अपुले पाय ।। 13

 

खंबीर असे हो नेता अमुचा

मनी जागतो दृढ विश्वास

स्वातंत्र्याची अनुभवुया हो

अशी खुमारी पुनरपि आज ।। 14

--------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

Wednesday, 22 March 2023

वेरूळ लेणी

 


वेरूळ लेणी

 

            शाळा सुटली पाटी फुटली अणि बालमैत्रिणींची संगतही सुटली. मनाच्या गुफेमधे मात्र ह्या बालमैत्रिणी वेरूळ लेण्यांप्रमाणे स्वतंत्र अस्तित्त्व टिकवून होत्या. मी साठीला टेकले तरी त्या मात्र दोन वेण्या वरती बांधणार्‍या स्कर्टमधल्या मुली म्हणूनच त्या वेरुळ लेण्यातील मूर्तींप्रमाणे वर्षानुवर्षे, दशकानुदशके जशाच्या तशाच होत्या. पुस्तकात प्रेस करून ठेवलेल्या फुलासारख्या! किंवा मोरपिसासारख्या! ---- रंग जराही फिका न झालेल्या--- आणि अचानक---- फेसबुक, फोन व्हॉटसॅप सगळ्यांनी करिष्माच केला.

 

( वृत्त - भुजंगप्रयात )

 

कधी थांबला काळ हा ऐलतीरी

मुली खेळणाऱ्याच शाळेतल्याची

मनीच्याच लेण्यातल्या स्तब्धमूर्ती

मनी राहिल्या कोरलेल्या तशाची

 

कुणी हासते बालिका खेळणारी

कुणी वाचते पुस्तके  अर्थगर्भी

सभाधीट ही,ती कलाकार कोणी

सराईत ही घालते लंगडीसी

 

मुली खेळणाऱ्यामुली नाचणाऱ्या

मुली बोलणाऱ्या , मुली भांडणाऱ्या

मुली हासणाऱ्याउड्या मारणाऱ्या

डबा वाटणाऱ्या , सख्या गोड साऱ्या

 

जणू खेळता खेळता स्तब्ध झाल्या

जशाच्या तशा थांबल्या गूढरीत्या

कसा वाजता वाजता चित्र झाला

अहो नाद घंटेतुनी बोलणारा

 

 

जलाच्या सवे ती नदी वाहणारी

जशीच्या तशी थांबली स्तब्ध झाली

सुवासासवे वाहणाराच वारा

मधे थांबला काळरूपीच पारा

 

जसेच्या तसे ते तिथे ऐलतीरा

इथे एकटी मी निघाले प्रवासा

किती मास वर्षे प्रवासात गेली

जरा वेग मंदावला येचि ‘साठी

 

मनीच्या गुहेमाजि डोकावताची

दिसू लागली स्पष्ट वेरूळलेणी

परी जाहले वेगळे आज काही

उठे शिल्प स्वप्नातले ते हसोनी

 

कशी सर्व मूर्तींस त्या जाग आली

पुन्हा धावती परकर्‍या सर्व पोरी

मला लागल्या बोलवू लौकरी ये

म्हणे साइसुट्यो पुन्हा खेळु तू ये

 

 

मला भेटण्या त्या घरी सर्व आल्या

प्रपातासमा काळ घेई उड्या हा

नव्याने जुना काळ वाहे खळाळा

जुने चित्र घेई नवे रूप आता

 

……………….......................

लेखणी अरुंधतीची-