Thursday 24 November 2022

पारिजात

 

पारिजात

                     पारिजाताचं फूल ते बीज तयार होण्याचा प्रवास मोठा बघण्यासारखा असतो. फूल गळून पडतांना सहजपणे त्याचा एक तंतु झाडावरच्या कोंदणात तसाच राहून जातो. पाऊस संपतो. फुलांचा बहर सरतो. येणार्‍या हिवाळ्यासोबत पानं झडून झाडाचाही खराटा तयार होतो. पण  त्यावर हिरवे हिरवे हिरवे बदाम लगडलेले असतात. हे बीजही गमतीशीर. एक नाही तर दोन बदाम एकमेकांची गळाभेट केल्याप्रमाणे एकमेकांना चिकटलेले. जणु उराउरी भेटल्यासारखे. गळून गेलेल्या फुलची आणि झाडाची ही मिठी  कवितेत बद्ध झाली आपोआप ---- 

( वृत्त – मालिनी; अक्षरे-15; गण- न न म य य; यति- 8,7 )

 

बहरुन तरु आला अंगणी पारिजात

धवल सुमनराशी केशरी त्यांस देठ।

परिमल मन मोही लाघवी मंदमंद

सुरवरनगरीचे रुक्मिणी-कृष्ण-प्रेम ।। 1

 

तरुवर सजला तो मौक्तिका-पोवळ्यांनी

गगन उतरले का चांदण्याचेच खाली।

धवल तुरग येती घेऊनी का रवीसी

उजळति जणु ज्योती अमृताते भिजोनी ।। 2

 

गदगद तरुबुंधा शेलटा हालवीता

भिरभिर गिरक्यांसी घेत या पुष्पमाला।

झरझर झरती का केशरी शुभ्र धारा

अलगद उतरोनी भेटती या धरेला ।। 3

 

कुसुम विलग होता पारिजातावरोनी

तरुवर मज आला एक तंतू दिसोनी।

जणु अडकुन त्यांचा कोंदणी जीव राही

तरु जपुन तयासी ठेवितो चित्तकोषी ।। 4

 

विसरुन झबले वा खेळणी राहताती

गडबडित मुलांच्या जैसी आजीकडेची।

निघुन सकल जाता ठेविते ती जपोनी

सुखद सय मुलांची आपुल्या त्या कपाटी ।। 5

 

सकल गणित तैसे भावनांचेच वाटे

तरु अन सुमनाचा भाव तैसाच दाटे।

फरक नच दिसे तो वृक्ष वा माणसाते

सकल जगति राहे एक चैतन्य तो ते ।। 6

 

कितिक दिवस गेले मौन झालाचि वृक्ष

 सहज रमुन गेला गंधवाही स्मृतीत ।

जपुनिच शिशुचे ते ठेऊनी बाललेणे

स्मृति सुखद जपे ती माय वात्सल्यभावे ।। 7

 

उघडुनी बसला तो बाललेणी सुरेख

सुहरित हृदयांचा मांडला चित्रलेख

सुहरित हृदयांनी वृक्ष गेला भरून

जणु हृदय फुलाचे भेटले का तरूस

 

हृदय मिलन दावी बीज ते प्रेमभावे

सुख अनुपम दाटे त्याचि आलिंगनाने

मिलन हृदयद्वयांचे पाहता हर्षले मी

कुसुमतरुवराच्या भावबंधा बघोनी

-------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

पळस

पळस      

मित्रांनो,

 कधीकाळी पुणे-मुंबई ट्रेन प्रवासात जुन्या घाट रस्त्याने जातांना वाटेत कर्जत ते खोपोली ह्या दोन स्टेशन्सच्या मधे पळसदरी नावाचं जंक्शन लागे. साधारणपणे येथे ट्रेनचा वेगही मंदावे. पळसदरीनंतर केळावली स्टेशन येई. सह्याद्रीच्या डोगरदर्‍यातील ही दोन गावं फार मनोरम असत. नावाप्रमाणे पळसदरी आलं की पळसाची भरपूर झाडं दिसायला लागत.

केळावली आलं की रानकेळांनी डोंगराच्या कडेकपारींवर टाकलेला हिरवागार मुक्काम डोळ्यात भरे. ह्या जंगली केळांना आम्ही चवीणीची झाडं म्हणत असू. त्यांचा बुंधा उंचीला एकदम खुजा असे. पानं मात्र केळीसारखी लांबसडक मोठ्ठाल्ली. नेहमीच्या केळीची पान वार्‍याने टरटरा फाटतात असं सांगणार्‍या बहिणाबाईंना ही केळ ताठ मानेनी सांगे, ‘‘ बहिणे!  अगं, आम्ही रानकेळी ! नाजुक साजुक फाटणार्‍या नाय. कितीही वादळवारं आणि पावसानं झोडपलं तरी फाटनार नाय, वाकणार नाय कारण आम्ही निसर्गासोबत जमवून घेतलाय.’’ केळांचे लोंगर लटकतांना दिसत. पण ते कोणी काढायची धडपड करतांना दिसत नसत. तेथील करवंदांच्या जाळीतून विकायला आलेली पानाच्या द्रोणातील ताजी करवंद अर्धी उष्टावून आम्ही कोंबडा का कोंबडी ते पहात असू. म्हणजे करवंद लाल निघालं की कोंबडा आणि पांढरं निघालं की कोंबडी.  तुला कोंबडे किती? मला किती च्या हिशोबात  थांबलेल्या ट्रेनला घाट चढण्यासाठी लागलेलं इंजिन धक्का देई आणि गाडी परत सुरू होई. रानमेवा म्हणून केळी विकत नसल्याची कारण मिमांसा नंतर कळली. ह्या केळांमध्ये ज्वारीच्या किंवा काळ्या वाटाण्याच्या आकाराच्या मोठ्या मोठ्या बिया असतं. त्यामुळे ही केळी खाण्यायोग्य नसत. खूप कालावधीनंतर आदिवासी क्षेत्रात काम करणार्‍या दीक्षितांच्या एका मित्राने सांगितलं की रानात राहणारे हे वनवासी  जन्मलेल्या नवजात अर्भकाला ह्या केळाच्या बिया  सहाणेवर दुधात उगाळून चाटवतात. तेच त्यांचं लसीकरण! सर्व रोगांना तोंड देण्याची प्रतिकारशक्ति ह्या बियांमधून त्यांना मिळते. कोणी लसीकरणासंबंधित संशोधन करत असेल तर त्यांनी हे जरूर तपासून बघावं.

पाठीवर गोंडस लेकराचं मुटकुळ आणि डोक्यावर लांबलचक काटक्याकुटक्यांचा भारा घेउन कॅटवॉकलाही लाजवतील अशा चटचट खडे पहाड उतरून जाणार्‍या वनवासी मुली आणि त्यांच्या चवळीच्या शेंगेसारख्या अंगकाठ्या आजही माझ्या नजरेसमोर जशाच्या तश्या उभ्या राहतात. त्यांचे गोड चेहरे भावशून्य रँपवॉक करणर्‍या डोईवर ही लोंबकळ हॅटफिट घालणार्‍या मुलींपेक्षा खूप सुंदर असत.

 उन्हाळा असेल तर दर्‍याखोर्‍यात केशरी फुलांनी लगडलेली पळसाची झाडं लक्ष वेधून घेत. जंगलात पळसच पळस फुललेले सत. आगगाडीतून जातांना जंगलात फुललेले अनेक अनेक पळस आकाशात केशरी प्रकाशझोत पसरल्याप्रमाणे दिसत. जणु काही उत्तर वा दक्षिण ध्रुवावरून चुंबकीय कणांनी साकारलेले aurora borealis आणि  aurora australis !

पावसाळा असेल तर वातावण मोठं रम्य असे. हिरव्याच्या अनेक रंगछटातून  रानात पक्ष्यांच्या विष्ठांमधून पडलेल्या पळसबिया रुजून ठिकठिकाणी तिन पर्णिका जमिनीतून बाहेर डोकातांना दिसत. नवीन पानांचे पोपटी रंग पालापाचोळ्यातून उठावदार दिसत. सर्व शाळेची मुलं गणवेशधारी असली तरी त्यांची कोवळीक आणि उंची पाहून ती पहीली, दुसरी, पाचवी अशी ओळखता यावीत त्याप्रमाणे एक वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची- ---- अशी उंची कतारने पळसबाळं ओळखू येत. उगीच गुणगुणायला होई,

आला आला पावसाळा

 तीन पानं पळसाला

दूर सारीत पालापाचोळा.

 लोटून दगड अधला मधला

तीन पानांचा पळस उगवला

पळसाचं फूल मला पृथ्वीच्या कललेल्या आसाप्रमाणे वाटतं. त्याच्या ह्या  Asymmetry मधे पृथ्वीची Symmetry  भरली आहे  असं वाटतं.

1999 साली पहिल्यांदा नागपूरची ओळख झाली. जालना, अकोला, नागपूर फिरता फिरता, रवी भवनमधे रहायला आलो. हे मंत्र्यांचे बंगले फक्त सेशनकाळात गजबजून जात बाकी 10 महिने ऑफिसर्सना रहायला मिळत. ह्या बंगल्यामधे एक सर्वात मस्त गोष्ट म्हणजे घराच्या मागच्या बाजूला लागून चारी बांजूंनी भिंतींनी बंदिस्त असा चौक होता. म्हणजे अंगण म्हणू या फार तर. भिंती चांगल्या पंधरा फुटी पक्या विटांच्या असल्यानी चौक सुरक्षित होता. छप्पर मात्र निळ्या आकाशाचं! वारा, पाऊस, ऊन, चांदणं आणि पक्ष्यांनाही यायला मज्जाव नव्हता. बंदिस्त घरात झोपण्यापेक्षा आकाशाखाली झोपायची कल्पनाच आम्हाला मोह घालून गेली. उंच भितींमुळे कुत्री, प्राणी आत यायाची काळजी नव्हती. रात्री आकाशात असंख्य तारका एकमेकांशी त्यांचे इवले इवले ओठ हलवत सतत काय बोलत असाव्यात? रात्रभर त्यांच्या गप्पा चालूच असत.

कणाकणाने गडद होत जाणारी रात्र सगळ्यांना अंधाराच्या बोगद्यात घेऊन जाई आणि कणाकणाने प्रकाशमान होत जाणारी पहाट अंधाराच्या बोगद्यातून जीवनाच्या आगगाडीला बाहेरच्या प्रकाशमय जगात फिरून घेऊन येई. सर्वांनी आकाश, झाडं पाहिली असली तरी अंधारा बोगदा संपला की फिरून निळ, आकाश, हिरवी झाडी पाहून गाडीतील सर्वांच्याच तोंडुन अद्भुत रम्य जग पाहता  एकदम हाऽऽऽ!!! अशी उद्गारवाचक प्रतिक्रिया निघावी तशी पहाट होताच रम्य जाग येई.  घराच्याच बाहेर तीन तीन मोठ्या मोठ्या पर्णदलांचे तळवे हलवत फुल्लकुसुमित पळस बाहेरून चौकात डोकावत हसत उभा असे. त्यानी घरात डोकावून बघायला आमची ना नव्हती. रात्रीच्या अंधारात पळसाच्या दिसणार्‍या काळ्या आउटलाईन मधे उषा तिचे गहिरे रंग भरायला सुरवात करे. आहाहा! काय हा दिमाखदार भगवा रंग! कदाचित डोळ्यात भरणारा हा रंग पाहूनच फार पूर्वी भारतीयांनी भगवा ध्वज स्वीकारला असावा. डोळे उघडताच सार्‍या पळसावर तजेलदार केशरी ज्योती तेवतांना दिसत. तर गुलाबी पळस मैनांच्या प्रचंड बडबडीनी, धावपळीनी सगळा परिसर गजबजून गेलेला असे. पळसाच्या बाकदार फुलाचे पोपटाच्या चोचीशी साधर्म्य पाहून पळसाला संस्कृतमधे ``किंशुक’’ म्हणजे ``काय पोपट तर नाही?’’ असं गमतीशीर नाव पडून गेलं. पळस आणि होळीचं घट्ट नातं आहे. पळस फुलतोच होळीच्या सुमाराला. आपले सगळेच सण निसर्गात असे घट्ट गुंफले आहेत. पळसाच्या फुलांपासून केलेला रंग होळी साठी वापरला जातो पूर्ण नैसर्गिक!

पळसाला गंध नाही म्हणून संस्कृतमधे ह्या झाडाला उगीच फार हिणवलं जायचं असं वाटलं. रूप, तारुण्य मोठ्या कुळात जन्म सर्व मिळूनही  विद्या न शिकलेला माणूस गंधहीन पळसासारखा असतो.

रूप-यौवन-सम्पन्नाः विशाल-कुल-सम्भवाः

विद्याहीनाः न शोभन्ते निर्गन्धाः इव किंशुकाः ।।

पाण्याला थोडाच गंध असतो! पण पाण्याशिवाय कोणी जगतं का? इतक्या पळसमैनांना आवडणारी जाडसर पाकळ्यांची फुलं सुवास नाही म्हणून कमी प्रतिची ठरवावीत हे --- हे त्याच्यावर अन्याय करणारं वाटायचं.

  असो! पळसाचं मनात वसललं रूप शब्दांमधे उतरवतांना लेखणी लिहीते,

 

वृत्त वसंततिलका

 

ज्योती अखंड जणु तेवत केशरी ह्या

ज्योतिर्मयी रुचिर उत्सव चालला हा

 

ह्या शेलट्याच पळसावर रंगदार

ज्वाळांस कोंब फुटलेच तजेलदार

 

सार्‍या वनी पळस हे फुलताच साचे

वाटे प्रकाशमय झोत नभात नाचे

 

नाहीच दाहक परी अनला प्रमाणे

हे शांत तेज विलसे पळसाफुलांचे

 

रंगोत्सवा बघुनियाचि थवे द्विजांचे

मैना करी कलकलाट अतीव मोदे

 

ज्वाळा अखंड जळती हसती रवीला

हे आतपी सुखविती मम अग्निज्वाला

 

हा होलिकोत्सव असे वनि देखणा गं!

 मी जाळिलेच शिशिरा म्हणतो निसर्ग

-----------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची-