Saturday, 30 September 2023

शब्द –

 

शब्द

कधी एकटी हिंपुटी बैसता मी

उदासी मना व्यापुनी राहता ती

सुटावी जरा गाठ अन् ओवलेले

मणी सर्व चौफेर ते ओघळावे ।। 1

 

तशी शब्दरत्नेच स्वर्गीय सारी

कुठे काव्यलेखांमधे गुंफलेली

सुटोनीच हृद् अंगणी धावताती

बघोनी तया चित्त हे लुब्ध होई ।। 2

 

जसे निर्झराने उड्या घेत यावे

तुषारांस त्या मुक्तहस्ते लुटावे

प्रपाताचिया त्या तुषारांप्रमाणे

उड्या घेत फैलावती शब्द सारे ।। 3

 

किती त्याचि शब्दावरी अर्थपैलू

तयातून फाकेच अर्थप्रकाशू

किती रंग दीप्तीतुनी व्यक्त होती

बघे विस्मये कौतुके मी तयांसी ।।4

 

तयातून जोत्स्नाच फाके सुवर्णी

तयांच्या प्रकाशी झळाळेच वाणी

मला सांगती शब्द ते गूज काही

अम्ही नूपुरे शारदाम्बा पदीची ।। 5

 

मिळो नाद वा गंध वा रंग दीप्ती

अहो शारदाम्बेचिया पाऊलांची

पदांचा तिच्या स्पर्श आम्हा मिळावा

तिचा डौल चालीतला प्राप्त व्हावा ।।6

 

म्हणोनीच केली पदी ह्याच दाटी

अगे बैसलो जन्मज्मांतरीही

अहो धन्य आम्ही पदस्पर्शमात्रे

मिळे मोद आमोद तो संगतीने ।।7

 

सुपुष्पे असू इंद्रबागेतलीही

परी शारदाम्बा पदी लीन आम्ही

मिळाया महा मोद आमोद पायी

विसावाच घेऊ तिच्या पादपद्मी ।। 8

 

कुठे शारदाम्बा? मला का दिसेना?

विचारेच भांबावुनी मी तयांना

``करी लेखणी घे मनी शब्दमोती

तयांच्याच दीप्तीत साकार होई ।। 9

 

कळी रत्नवेलीस ये माणकांची

मिळे सागराला जशी चंद्रकांती

हिमाद्रीच होतो जसा स्वर्णकांती

करी काव्य तैसे सुवर्णाक्षरानी’’ ।।10

 

 धरी हात शब्दांक्षरांचाच तूची

तुला शारदेच्या पदी तेच नेती

तयांच्याच दीप्तीत नेत्रांसमोरी

पदे माऊलीचीच येती दिसोनी ।।11

--------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

 

 

 

 

देवदंगा

 

देवदंगा

गणपती गावाला गेले आणि पंधरा दिवसांसाठी डोल्बींनी विश्रांती घेतली. हलवाई येणार्‍या नवरात्रीसाठी मोदक मोडून बर्फ्या बनवायला सज्ज झाले आहेत. नवरात्रीच्या नऊ रंगांच्या साड्यांची तोरणं दुकानांवर लटकवण्यासाठी साडी दुकानदार सज्ज झाले आहेत. फुलवाले, फळवाले, उपवासाचे पदार्थ घेऊन वाणी, नारळवाले, ढोलवाले, नव्यारूपात सज्ज होत आहेत. भक्तीने उंबळणारे भक्त नव्याने कचेरीत रजा मांडायला वा रजा न मांडता मी देवाचा नेम कसा मोडत नाही हे सांगायला/वागायला नव्या दमाने एका पायावर तयार आहेत. एका देवाला निरोपाची पानसुपारी झाली की दुसरा देव तुतारी वाजवत मांडवात प्रवेश करतोय. खरोखरच श्री कचेरी/ऑफिसेस चालवायला समर्थ आहे म्हणूनच हे रहाटगाडगं सुरळीत चालू आहे अशी आता माझी अतूट श्रद्धा झाली आहे. देव आता भक्तांच्या हातातून ओरबाडून काढून घेऊन कधीच असामाजिक तत्त्वांचा, व्यापार्‍यांचा कोटिकोटीचा देवधंदा झाला आहे.

देवदंगा नाच नंगा   । काल बाप्पा  आज अंबा

पिचलेल्यांच्या कमनशिबावर । कोटि कोटिचा देवधंदा॥1

कचेरीत एकटा तिरंगा । देवासाठी सुदूर रांगा

पायी चालत घालत पिंगा । भक्तगणांची लोटे गंगा॥2

देवांचेही नशिब फळफळे । दिवस अचानक ये सोन्याचे

काल उपाशी आजचि पेढे । दुधातुपाचे घडेचि उपडे॥3

काल स्वच्छता राखायासी । कोप र्‍यात जो पदपथ राखी

आज अचानक त्याला मखरी । स्थान मिळे बहु उंचावरती ॥4

जैसी वाढे देवाची पत । लोक-नियम त्या वाटे जाचक

पोलिस ठाणे अग्नी शामक । उखडुन देती दो रात्रीतच ।।5

चेंगरले जरि भक्त गर्दिने । भडके जरि वा आग अचानक

का आग विझविण्या समर्थ बाप्पा। का गर्दीतही राखे सज्जन ॥6

देव पावतो बहु नवसाला । होता ऐसा गाजावाजा

काम सोडुनी लोक धावती । रांगांवरती चढती रांगा॥7

पानसुपारी फुलवाल्यांचा । चालू होतो एकच कल्ला

हार फुले घ्या, काढा चपला । देवदयेवर भरती गल्ला॥8

रोज छापती हजार पोथ्या । सिद्ध मंत्र वा सुरस कथांच्या

चमत्कार हे पानोपानी । पिचलेल्यांना लावि गळाला ॥9

देवावरती घेता शंका । प्रसंग येइल त्यावर बाका

धन कांचन परि तया अर्पिता । प्रसन्न होती देवदेवता ॥10

हात कांचनी पाय कांचनी । दुर्वा मरवा कुसुम कांचनी

कांचन मोदक देवा हाती । हिरे माणिके जडवुन त्यासी॥11

‘‘कांचनमृग’’ हा जनी सोडला । भले भलेही भुलती याला

आशा लावुन पिचलेल्यांच्या । काढुन घेती वित्त कांचना।।12

पाहुन देवाचा तो भपका । भक्त गोंधळे नसेचि पैका

``टाक नोट रे हा नवसाचा'' । गुरव ओरडे देउन धपका ॥13

कंठ फोडुनी गाति आरत्या । बडवित घंटा शंख नि झांजा

हलकल्लोळचि घनघोर पाहता । शांती गेली सोडुन देवा॥14

`ध्वनी दैत्य' हे पिसाळलेले। धरुन आणिती संतजनांना

`ध्वन्यस्त्रावर' जोडुन त्यांना । `लक्ष्य –कर्ण' या साधिति नेमा॥15

कामावर रडगाणे दांड्या । पालखीचा परि रुते न दांडा

कोस कोस ही चाल चालण्या । उत्साहाने चाले तांडा॥16

लोकविलक्षण भक्तीचा या । परिचय देती मार्ग, मार्गिका

हॉटेल धाबे बार जोडिला । ओतती दुर्गंधी अन कचरा॥17

टोल कराचे नाव ऐकता । तळपायाची आग मस्तका

पेट्या, हुंड्यांमधे सापडे । कोटि कोटीची मालमत्ता ॥18

तुपात निथळे शिरा केशरी । लाडू पेढे मोदक बर्फी

कमी पडे का देवा म्हणूनी । महाप्रसादा द्याचि वर्गणी॥19

``काम करा रे'' बॉस बोलता ।  राग राग तो नाकावरचा

दिवस दिवस रांगेत शिणोनी । देवापायी घासति माथा॥20

संस्थानाचे पदाधिकारी । त्यांना लागे फोर्ड फरारी

संस्थानावर ज्याची सत्ता । त्याला मिळते इथली मत्ता ॥22

 शेयर चढती शेयर पडती । तसे देव हे उठती बसती

लाभ उकळुनी होता पुरता । लोप पावती देव-देवता॥23

एका देवा पानसुपारी । दुस र्‍याची वाजेच तुतारी

देव उभे हे लावुन रांगा । म्हणती आता माझी बारी॥24

पृथ्वीवरती चतकर जागा । पाय ठेवण्या यांना मिळता

देवा`तर्फे' उलथुन देतील । मानवता हे रसातळाला॥25

----------------------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Friday, 29 September 2023

मॅडम नॉट नाऊ

 

मॅडम नॉट नाऊ

इथ्थे इथ्थे उभी होते  हातात माझ्या खाऊ

बघता बघता घेऊन गेला झाडावरचा काऊ

 

इथ्थे इथ्थे उभी होते  गॅसपाशी पाहू

बघता बघता पातेल्यातून   दूध लागलं वाहू

 

आत्ता आत्ता केस माझे  होते दाट मऊ

कानी माझ्या कुजबुजले ते वय लागलं होऊ

 

दातांनाही आवडत होते गुडदाणी अन लाडू

डेंटिस्ट म्हणे आता नको, खा सूप लापशी मऊ

 

आत्ता आत्ता पाय माझे  म्हणत होते धाऊ

खूप झालं डॉक्टर म्हणे । ``मॅडम नॉट नाऊ''

 

 

आत्ता आत्ता समोर होते  बाबा आई भाऊ

 विचारे काळ  हसुन  कोठे गेले सांग पाहू?

 

----------------------------------------------------------------

लेखणीअरुंधतीची-  

 

पारावरचा देव काळा

 

पारावरचा देव काळा

तेव्हा देवाचं इतकं स्तोम माजलं नव्हतं. तिरुपती, शिर्डी, शनीशिंगणापूर, दगडूशेट, लालबागचा राजा, उद्यान गणेश अशी महाप्रस्थही नव्हती शनीशिंगणापूरसारखे देवही पारावर सहज जाता जाता भेटायचे. अशा अनेक पारावरच्या देवांना जाता जाता रस्त्यावरच चप्पल काढून लोक मनोभावे हात जोडून जायचे. कुणी स्कुटरचा वेग कमी करत पै पैसा खालून वरच्या दिशेला हलकेच उडवताना तो देवाला लागणार नाही पण त्याच्या पुढ्यात पडेल असा नेम धरून उडवत. एखादी माउली  चतकर भांड पाणी घालून गंधफूल लावून पूजा करून पारावरच्या मारुतीच्या ओठांवर गुळ आणि फुटाणे चिकटवून जाई. तर खाली वाट बघणारी बकरी पूजा करणारी माउली पारावरून उतरताच हनुमंताच्या खांद्यावर पुढचे पाय ठेऊन त्याचं मुख आपल्या जिभेने चाटून चाटून स्वच्छ करे.

 पण आता कोणालाच देवइतका सहजासहजी भेटत नाही. ----- आणि म्हणूनच ----

 

पारावरचा देव काळा

मला कसा आपला वाटतो

सारख्याच प्रेमानी तो

सगळ्यांनाच भेटतो

 

कोणी तरी माय त्याच्या

ओठी गुळ भरवून जाते

त्याच्या ओठीचा आपल्या पोटी

बकरी खुशाल करुन जाते

 

जाता येता सहज सुंदर

देवाची ती भेट होते

चांगलं जीवन जगण्याची

पुन्हा एकदा उमेद मिळते

 

पारवरचा देव काळा

पाण्यानेही ओलावतो

स्नेहाने तो सुखावतो

रणरणत्या उन्हातही तो तेवढाच शांत असतो

 

हिरव्या पानातून ठिबकलेला

अस्ताव्यस्त पांढरा ओघळ

तो गंध म्हणून मिरवितो

‘‘समत्वं सुखदुःखेषु’’ सर्वांनाच दाखवून देतो

 

कोणी दुःखी कष्टी जीव

 त्याच्या पारावर विसावतो

पुढयातल्या तांदुळांवर

चिमण्यांचा थवा नाचतो

 

`माऊली' ही साद ऐकता

तो सहज बाहू पसरतो

एका विटेच्या तुकड्यावर

अठ्ठावीस युगे उभा राहतो

 

पण आता युग बदललय-------

डोक्यावरचं हिरवं छत्र

देवांनीही गमावलय

पारावरच गुंडाळून आसन,

साम्राज्य नव उभारलय

 

चवली पावली अधेलीला

तो ही आता कंटाळलाय

भेटीसाठी त्याच्या आता

हजाराचं तिकीट लागलय

 

नटून थटून तो आता

परदानशीन बसतो

तिकीटवाल्या लेकरांनाच

सर्वात आधी भेटतो

 

डोळे टक्क उघडे

आणि म्हणे तो झोपतो

स्टँपिड मधेच भक्तांना

मोक्षही प्रदान करतो

 

गाभार्‍यात त्याच्या आता

 असतो अंधार कुट्ट काळा

उजेडात चमकतात फक्त

हिरे मोती माळा

 

नाही माऊलीचा स्पर्श

ना आशीर्वाद भाळा

दुरूनच जातो मी

घ्यावा राम राम देवा!

------------------------------

लेखणीअरुंधतीची-