Wednesday, 27 September 2023

चैतन्य

चैतन्य

( मात्रा - 10:11 )

मी तुला पाहिले, दुरुनी सखया आज

लव संधिप्रकाशि, उजळता किंचित मुख

घनगंभीर गमे , ओझरते तव रूप

परि क्षणात ठसले, अगाध तव दर्शन

 

तव रूप अलौकिक, अनुभवता एकदा

मम चित्त जाहले, सैरभैर सावळ्या

संसार सुखाचा, असार ठरला सख्या

तुजपुढती विटला, भवसागरही मधुरा

 

तव आकर्षण मज, परतूही देइना

संसार मोडुनी, आले तुज भेटण्या

तू वीर धीर अन, अधीर पाऊल माझे

बाधले न काटे, परि मज रस्त्यामधले

 

तो प्रकाशक्षण मज, हुरहुर लावुन जाय

वितळून जाहले,  नभी निलीमा मीच

हा देह कुणाचा,  प्रश्न संपला आज

पोपडा पडे तो, चैतन्य उरे एक!

--------------------------

#लेखणीअरुंधतीची-


Sunday, 24 September 2023

वार्‍याची छत्री

 

वार्‍याची छत्री


( मात्रा - 8;8  8;4 )


वार्‍या वार्‍या कुठे चालला

घेऊन मोठी छत्री

काळ्या काळ्या मेघांची ही

झाकोळेच धरित्री --- 1

 

नभाएवढी गोल गोल ही

फिरवित फिरवित जासी

काळवेळ ना तुलाच काही

दिवस तुला ना रात्री --- 2

 

पर्वतमाथ्यावरी घेतसे

छत्रीसवे भरारी

महा खोडकर वात्रट भारी

उतरून जासी दरी --- 3

 

गोल गोल फिरविताच छत्री

उडून पडे कुठेही

पडता खाली मेघ रडूनी

वाहू लागे पाणी --- 4


मेघांच्या त्या छत्रीची ही

पाहुन दैना ऐशी

नभी हसे तो भास्कर गाली

खुदकन हसे धरित्री --- 5

------------------------

#लेखणीअरुंधतीची-


Thursday, 21 September 2023

माझी चाल

                                                              माझी चाल

( वृत्त – भुजंगप्रयात )

अहो चालते वृत्त मार्गावरी मी

दिमाखात तोर्‍यात सर्वांपुढे मी

कळेना परी वल्लभा तो म्हणेची

"कुठे पाहते? चालते तू कुठे ही"

 

असे नगिणीसारखी चाल माझी

`भुजंगा’प्रमाणेच झोकात जाई

पतीला परी वाटते केरसूणी

"तुझी ओढणी मार्ग झाडी त्वरेनी"

 

कधी वृत्त झोका नभा स्पर्शिता हा

वदे मीच आनंदुनी आ! अहाहा!

पती बोलतो गे ऽऽ चि "खड्डा पहा हा!

तुझा मोडता पाय होईल हा हा!"

 

स्रवे वृत्त-निस्यंदिनी चित्तकोषी

गमे माधुरी अमृताचीच राशी

परी वल्लभा ना तयाचीच गोडी

चहासी वदे शर्करा घाल थोडी

 

मला  काव्य ने कल्पनांच्या तळाशी

भरारी कधी घेत आकाश-देशी

"कशाच्या सवे खाऊ या काव्यराशी

वदे  ``अन्नपूर्णे!’’ पती ``मी उपाशी’’

 

कधी स्वार अश्वावरी श्यामकर्णी

दिमाखात दौडेच मी “अश्वधाटी”

"नसे षोडशी राहिली तू तरूणी"

करी व्यक्त चिंता पतीचीच वाणी

 

कधी “चंचला” चालते मी “हरीणी”

कधी मीच “हंसी” कधी मी “मयूरी”

``तुझी काव्यसंध्या असे का जरूरी’’

म्हणे जांभई देत तो ``झोप बाई!’’

-----------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-



Wednesday, 20 September 2023

तुलसीविवाह

 

तुलसीविवाह

 

तुलसीविवाह

दसरा सरला आत्ता म्हणता म्हणता  दिवाळी येते. की आलच तुळशीचं लग्न!  मंजिर्‍यांनी डवरलेली अवखळ तुळस त्या उगवत्या नारायणासोबत मनमुक्त हसत आणि ‘‘डुले मंजिरी मंजिरी प्राजक्ताच्या पायापाशी’’ म्हणत तारुण्यात पदार्पण करते.   

तरुण तुलसी मालांनी मनातच भगवंत नटतो. ``तरुण तुलसीमाला’’ म्हणजे फुलावर आलेली तुळस! ती उपवर झाल्याचं की हो लक्षण!

तुळशीविवाहाचा सोहळा तर निसर्गानेच ठरवलाय. निमंत्रणाच्या अक्षता घेउन कितीजण उभे आहेत.

 

तुलसीविवाह

 

मात्रा - 8:8:8:6

 

श्रीरंगाचा तुळशीसंगे । विवाह निश्चित झाला हो

कार्तिक मासी शुद्ध द्वादशी । मुहूर्त गोरज ठरला हो

 

सुबक ठेंगणी तुळस साजिरी । शालु नेसली अंजीरी

निळा जांभळा पदरचि त्याचा । कशिदा त्यावर मंजीरी

 

तरु-पोशाखा-मधेचि यावे । नातलगांनी सार्‍या हो

वर्‍हाडास सार्‍याच कळविले । बेत ठरविला पक्का हो

 

बहिण सुभद्रा बनुनी कांचन । आकर्षक अति सजली हो

निळ्या जांभळ्या लाल फुलांची । नेसुन साडी हसली हो

 

तुळशी मागे उभा राहिला । पुंड्या ऊसचि मामा हो

गोड काम हे मला करू दे । धरुनी आग्रह ऐसा हो

 

वर्‍हाडातल्या मान्यवरांचे । स्वागत करण्या नटुनी हो

उभा गगनचाफा बनुनीया । बलरामचि तो ऐटित हो

 

चार पाकळ्यांच्या घंटांचे । नाजुक नाजुक लेवुन हो

अलंकार ते अंगावरती । शोभुन दिसती धवलचि हो

 

सजवितोच रांगोळ्या सुंदर । होति उपस्थित मुग्धचि हो

किती झुंबरे नाजुक नाजुक । वार्‍यावरती झुलती हो 


कुणी जाहले शेवंती तर । मरवा चाफा कोणी हो

कुणी जाहले राऽतराणी । बोगनवेली कुंदचि हो

 

मोरपिशी रेशीमवस्त्र हे । नीलअंबराचे बहुमोल

नेसुन हरि हा दिसे देखणा । खिळले डोळे त्यावर हो

 

तरूण तुलसी मालांचे हे । बाहु घालुनी हरिकंठी

तुळस लाजुनी गोरीमोरी । हरि वक्षावर मुख लपवी

 

क्रोधे झाल्या भामा रुक्मिणि । पारिजात मोगरीच हो

झाडुन सारी फुले नि पाने । रुसून अंगणि बसल्या हो


सौख्याचा हा असे सोहळा । नवरा नवरीकडुनी हो

वर्‍हाडास आहेर मिळे तो । सुखसमृद्धी यांचा हो

------------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-


गगनचाफा / बूच

 

 

गगनचाफा / बूच

 पावसानी जरा जरा माघार घ्यायला सुरवात केली असताना, हवेत पावसाची नमी टिकून असताना, हवेत थोडा गारवा झुळकेसोबत फिरू लागला असताना,

गगनजाई, गगनचाफा, गगनमोगरा ह्या सुंदर सुंदर नावांनी निरनिराळ्या ठिकाणी ओळखलं जाणारं बूचाचं झाड फुलायला लागलं आहे.

फुलांमुळे झाड आणि मुलांमुळे मायबाप ओळखले जाऊ लागले की, ते धन्य होतात.

( मात्रा - 8: 8: 11 )

 

अधोमुखी ही फुले लोंबती; शुभ्र सुवासिक किती

जणू घंटिका नाजुक नाजुक; देवालयी रुळती ।।

 

दीपमाळ तेवते शांतशी; सुरम्य धवल ज्योती 

पवनासंगे हलती डुलती; परी न थोरावती ।।

 

भव्य गोपुरासम तरुवर हा; उभा भारदस्त

भूवर रंगावली सजवली; धवल फुलांची रम्य।।

 

परिमल त्यांचा मंदमंदसा; दरवळे धूपासम

निसर्गदेवाचे देवालय; शिव सत्य सुंदरतम ।।

 

किती भव्य हा सरळ मनाचा; गगनचाफा फुलला

तरुवर उंचापुरा सुवासिक; विष्णुमूर्तिसम गमला ।।

-------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 

 


 

Tuesday, 19 September 2023

सप्तपर्णी

 

सप्तपर्णी

काही झाडं जात्याच चिवट, दडस, मजबूत असतात. खोडकिडा, पोरकिडा, बोंडआळी, उंटआळी, करपा, तांबेरा असे कुठलेही रोग त्यांच्या वाट्यास जात नाहीत. ही झाडं मात्र त्यांच्या आगाऊपणामुळे दुसर्‍या कुठच्या झाडाला आपल्या वार्‍याला उभं करत नाहीत. सहाजिकच ही झाडं भारतीय असण्यापेक्षा परदेशी असण्याचा कल जास्त दिसून येतो. शतकं संपली पण ऑस्ट्रेलियातून आलेलं काँग्रेस गवत असो, वा निलगिरी, सुबाभुळ, ग्लिरीसिडिया/उंदिरमारी वा इतर तत्सम झाडं असोत. वा चिनी बनाटीचं सप्तपर्णी असो.

परदेशी लोकांनी ज्याप्रमाणे भारतीयांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना मारले त्याप्रमाणे ही झाडंही  आपल्या भारतीय झाडांना नामशेष करत आहेत. ही झाडं वाढतांना मातीतील सर्व पोषकतत्त्वे भसाभसा घेऊन भली भक्कम वाढतात. सप्तपर्णीचा उल्लेख सैतानाचं झाड असा केलेला आढळतो तरी हे झाड वनविभाग वा सर्व महापालिकांचं फार लाडकं झाड आहे.

 

सप्तपर्णी

(वृत्त – भुजंगप्रयात)

जरा ओसरे ती हवा पावसाळी

जरा वाहु लागेच वारा हिवाळी

अशा दो ऋतुंच्या सदा संधिकाळी

फुले सप्तपर्णी पहा सांजवेळी

 

उठे वृक्ष निद्रिस्त जैसा उठावा

शरीरामधूनीच सैतान तैसा

लपेटून घेई तनू ती स्वतःची

हर्‍या-गाभुळ्या पुष्पगुच्छांमधे ती

 

पराकोटिचा तो सुटे गंध त्याचा

नको होतसे उग्र तो दर्प नाका

सुरू होय डोकेदुखी ती अवेळी

उमासेच येती जना सांजवेळी

 

बहू शिंकुनी लोक हैराण होती

तरी गल्लि दिल्लीत सर्वत्र जाणी

असो पालिका वा वनोद्यान खाते

विभागांस सार्‍या रुचे सप्तपर्णी

 

विषारी असे चीक त्याचा म्हणोनी

न लागे किडा, खात ना त्यास प्राणी

जरी काळजी घेतली ना तयाची

तरी पाय रोवून खंबीर राही

 

नसे खर्च खात्यांस त्याचा जराही

न कापे तरूला कुणी इंधनासी

म्हणोनी पथांना सदा भूषवी हा

चिनीवृक्ष दीर्घायुषी सप्तपर्णी

---------------------------------

#लेखणीअरुंधतीची-


 

Saturday, 16 September 2023

एक सकाळ

 

 एक प्रभात

             पूर्वेला लालबुंद सूर्यबिंब वर येत असतांना पश्चिमेला अस्ताला जाणारं चंद्रबिंब  मावळतीला चाललय. दोघांच्या सोबत त्यांचं रंग सैन्यही एकवटून त्यांच्या पाठीशी आकाशात उभं आहे. सूर्यासोबत सर्व प्राचीच लाल, पिवळ्या, केशरी नारिंगी रंगानी दाटलेली नटलेली असतांना, डोक्यावरचा फिकट होत जाणारा निळा आकाशघुमट पश्चिमेला मात्र गडद निळा रंगलेला. चंद्रासोबत असलेल्या रुपेरी सैन्य किरणानी अपूर्वेला गडद निळ्या घुमटावर चंदेरी जाळं टाकलेलं. अशा क्षणाची साक्षी होण्याचं भाग्य लाभलं आणि ते क्षण श्रीमंत करून गेले.

पुनवेच्या त्या प्रातःकाली

सप्तर्षींची सभा संपली

नील तलम अंबरी तारका

नक्षत्रहारातुन ओघळली ।। 1

 

सहस्ररश्मी रक्तबिंब ते

प्राचीवर आरक्त जाहले

अपूर्वेस का रुपे वितळले

चंद्रबिंब ते सुहास्य विलसे ।। 2

 

सौंदर्याचे महारथी ते

तेजाचे का दोन प्रतिनिधी

एकामेका आज भेटले

आकाशाच्या तीरांवरती ।। 3

 

रंगांच्या भाषेत बोलले

परस्परांशी चंद्र रवी

जिथे कौतुका शब्द न पुरती

तिथे रंग हे काम करी ।।4

 

"शुभ्रभानु तू कलानिधी तू

कुमुदप्रिय हे निशाकरा

थांब जरासा रवी बोलला

नभोदीप हे सुधाकरा'' ।।5

 

शीतांशू तो हात जोडुनी

सौम्य सौम्य वदता झाला

“तमोभेदि हे सहस्ररश्मी

तेजोनिधि रे नमन तुला '' ।।6

 

मोहित दोघे परस्परांवर

किती उधळले रंग तयी

गुणी जाणतो गुणी जनांना

प्रत्यय त्याचा दिसे नभी ।।7

 

लाल केशरी सोनसळी अन

निळे जांभळे जरतारी

तांबुस पिवळे रंग स्तुतीचे

नभी विखुरले कितीतरी ।। 8

 

स्तुतिरंगांनी प्रभात न्हाली

रंगांची बरसात नभी

स्तब्ध होऊनी बघत राहिली

आम्रमंजिरी नवी नवी ।। 9

 

मान उभारुन कल्पतरूही

बघत राहिला मैत्र अशी

वसंत सुंदर नभी प्रकटला

रंगांची बरसात नवी ।। 10

 

काळ न थांबे कुणाचसाठी

चंद्र बुडाला नीलनभी

हलके आली जाग सृष्टिला

रवी उदेला पूर्वदिशी ।।11

 

मुदित जाहले द्विजगण सारे

मैफिल रंगांची त्यांनी

आज गुंफिली सुरांमधे ती

किरणांची आतशबाजी ।।12

-------------------------------

 #लेखणीअरुंधतीची–

(अरुंधती, 

तुझी कविता वाचून माघाच्या काव्याची आठवण झाली. एकाच वेळी आाकाशात चंद्र आणि सूर्य यांचे दर्शन होते आणि आकाश हे एखाद्या हत्तीप्रमाणे दिसत आहे. ज्याच्या पाठीवरून सूर्य आणि चंद्र ह्या  दोन घंटा लोंबत आहेत. ह्या रूपकावरून त्याला घंटा माघ असं म्हणतात.

- माणिक ठकार.)