Tuesday, 21 March 2023

महाराष्ट्रभूमी

 

 

महाराष्ट्रभूमी


महाराष्ट्रभूमी असे श्रेष्ठभूमी

जिथे खड्गपात्यात राहे भवानी ।

रणी ऐरणी अग्निदिव्यातुनी जी

सुलाखून तावून घे पारखोनी ।। 1

 

असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.

 

इथे चंडमुंडास धाडून स्वर्गी

अरीमुंड हाती धरोनी भवानी

म्हणे, ‘‘ मृत्यु ही दुर्गती दुर्जनांची

इशारा पुरे एक दुष्टांस हाची ’’ ।। 2


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु. 


महाराष्ट्रमाती असे रत्नखाणी

विराजे हृदी जानकी स्वाभिमानी

दबावापुढे ना झुके रुक्मिणी जी

अहो भीमकन्या-नलाचीच जोडी ।। 3


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.

 

स्वराज्या सुराज्यास स्थापे शिवाजी

जिजाबाइचे स्वप्न सत्यात आणी

मनु हार माने न येथेच मानी

अहिल्या पुन्हा जागवे अस्मितेसी ।। 4


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.


दिल्या यातना धर्मवीरा किती त्या

परी केसरी तो जराही झुकेना

पशुंना दिले मांस त्याचे पशुंनी

धरा अंकुरे त्याच श्रद्धांकुरांनी ।। 5


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.

 

‘‘भयाने रिपू-अश्व ना पीत पाणी’’

असे सांगते शौर्य येथील माती

असो खड्गपाती असो शब्दमोती

झरे त्याच तेजातुनी देशभक्ती।। 6


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.

 

इथे तर्जनी एक उंचावताची

उडे झोप सार्‍याच टोपीकरांची

उडी एक ती आजही आठवीता

उठे लाट देशाप्रती आदराची ।। 7


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.

 

असो लावणी संतवाणी विराणी ।

कला शब्दमालाच येती फुलोनी

शिलाशिल्प वा शब्दशिल्पातुनी ह्या

महैश्वर्य येई पुनःप्रत्ययासी ।। 8


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.

 

जलाने शिवारे बलाने शरीरे

मने युक्त येथे सदा सद्विचारे

नव्या कल्पनांसीच येती धुमारे

सुधारेच गावा नवे तंत्र सारे ।। 9


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.

 

दुजाभाव ना येथ कोणाप्रतीही

मिळे काम हातांस आश्वस्त राही

कुणीही न राहे कधीही उपाशी

असे थोर दातृत्व येथेच राही ।।10


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी ।। ध्रु.


 

असे टाकली कात ती जीर्णशीर्ण

नव्याने उभा हा महाराष्ट्र पूर्ण

यशाची उभी उंच राहे कमान

महाराष्ट्र माझा असे स्वाभिमान ।। 11


असे पुण्यभूमी असे कर्मभूमी

महाराष्ट्र माझा असे जन्मभूमी 

चला हात हातात घालून वेगी

चला सोबतीने यशाच्या सुमार्गी।। 

----------------------------------

 


 

दीपमाळ

 

दीपमाळ

 

अहो जाहला देह हा दीपमाळ

उभा राउळाच्या पुढे सर्वकाळ

जना दावितो वाट ही राउळाची

सदा भक्तितेजात तेजाळलेली ।। 1

 

पहा तेवती लक्ष ह्या सांजवाती

प्रभेनेच ओथंबल्या दाट राती

बघे हा दुरूनी मला भक्तवृन्द

भरूनीच येई तयांचेच चित्त  ।। 2

 

पटे राउळाची मनी खूणगाठ

तयांचेच ओलावती नेत्रकाठ

“जरी पाय भेगाळले चालुनी हे

तरी लागले  सार्थकी चालणे हे”  ।। 3

 

“अबीरा-समा वाटते आज धूळ”

बघोनी म्हणे भक्त , ही दीपमाळ

“करांनी जुळावे अपोआप आज

असा श्रीहरी दर्शनाचा सुयोग”  ।। 4

 

श्रुती बोल हे ऐकुनी  धन्य होत

सुखावून मी होतसे नित्य तृप्त

असे माखता पायधूलीत अंग

मला लाभतो नित्य श्रीरंगसंग  ।। 5

 

जरी पाहिले ना तुझ्या श्रीमुखासी

भरूनीच डोळे प्रभो एकदाही

सदा सर्वदा हे उभे राहणेही

मला मान्य रे राउळीच्या समोरी  ।। 6

 

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Monday, 20 March 2023

आंबे पिकले आज!

 

 

आंबे पिकले आज!

 

कैर्‍यांच्या  शेंड्या

लांब लांब लांब

धरून ठेऊन झाड म्हणे

 थांब थांब थांब !!!

 

वार्‍यासंगे उंच उंच

झुलु नको लांब

खोडकर वारा  पाडेल तुम्हा

म्हणेल, ``मी भोळा सांब! ‘’

 

इतक्यात नको टाकू

 एवढी मोठी ढांग

खाली पडताच पडेल खोक

 मग काय करशील सांग ?

 

उतरवेल माळी एकेकाला,

तुमची आढीत लावेल रांग

पांघरून घालेल मऊ मऊ गवत

अंगावरती छान!!

 

अंगरखा हा हिरवाकंच

हिरवा हिरवा गार

 देवाजीच्या जादूने

बदलून जाईल पार!!

 

रंग पालटेल होईल तलम

छटा येईल छान!

सोनेरीसर पिवळ्यावर

येईल तांबुस झाक

 

घरभर अस्सा दरवळेल

सुगंध गोड गोड खा

धावत येतील मुले सारी

म्हणतील आंबे पिकले आज!

---------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

आम्रयोद्धा -

 

आम्रयोद्धा -

बोलण्यानी मन कळतं फुलण्यानी झाड कळतं. काही झाडं फुलांच्या फुलण्यानी कळतात तर काही झाडं फळांच्या लगडण्यानी कळतात. मोगरा, गुलाब, बकुळ पारिजात, गुलमोहर, त्यांच्या फुलांमुळे सुशोभित होतात. तर संत्री, पपया,  फणस, त्यांच्या फळं लगडण्यानी ऐश्वर्यशाली होतात. पेरूची फुलं आणि गुलमोहराची फळं मुद्दाम पाहिली जात नाहीत. बकुळीची फुलं जमिनीवरूनही उचलून घेतली जातात पण वर पाहून त्याला आलेल्या फळांची कोणी फार प्रशंसा करत असेल असं वाटत नाही. पपईला नर फुलं आली तर आनंदित होण्याऐवजी अरेरे म्हणून त्याचा तिरस्कार होतो तर नारळाच्या पोयीला छेद घेऊन त्याखाली मडकं बांधलं जातं.

पण एकच आम्रवृक्ष असा आहे की त्याच्या इवल्या इवल्या फुलांच्या मोहराचा सर्वांनाच मोह पडतो. बाणाप्रमाने टोकदार, जोमदार आलेले फुलांचे हिरवे किंवा तांब्याच्या रंगाचे मरून तुरे सार्‍या वृक्षाच्या अंगावर आनंदानी काटा आल्याप्रमाणे दिसतात. किंवा बाणाप्रमाणे टोकदार, जोमदार आलेले फुलांचे तुरे म्हणजे वसंताने पुष्पधनुष्याला लावलेले बाण आहेत असे म्हणत कालिदासही म्हणतो ``वसंत योद्धा समुपागतः प्रिये ।’’ मोहरलेले आंब्यांचे डेरेदार  झाड येणार्‍या जाणार्‍याला वेड लावल्याशिवाय राहात नाही.

फुलारलेला आम्रवृक्ष जितका सुंदर दिसतो तितकाच लांबलचक देठांच्या लोंबकाळणार्‍या कैर्‍यांनी लगडलेले, पाड लागलेल्या आंब्यांचे झाडही मोहक असते. आम्रतरुच्या लावण्याचं अधिराज्य डिसेंबर जानेवारीपासूनच सुरू होतं ते थेट पावसापर्यंत टिकून राहतं. पावसानंतर त्याला येणारी सशाच्या कानासारखी लांब लालेलाल पानंही झाडाला परत सुंदर बनवतात. मातीत पडलेली आंब्याची कोयही पावसाने रुजून वर येते आणि लहान बाळाच्या तळव्यासारख्या कोवळ्या लालबुंद पानांना जन्म देते. चैत्रापर्यंत घराच्या तोरणाला, पूजेला कलशाच्या पाण्यातही ही पानं स्थानापन्न होतात. आणि आंब्याचं राज्य  माणसाच्या मनावरही अधिराज्य गाजवत राहतं.

फुलांनी मोहरलेल्या आंब्यावर कविता लिहायचा मोह मला आवरला नाही.

 

मोहरला मोहरला । आम्रतरू मोहरला

 दरवळला दरवळला । आसमंत घमघमला

 

सरसरून सर्वांगी । काटा हा फुलला का

मधुर स्पर्श तरुला ह्या । कुणि केला कुणि केला

 

तरुवर हा बघतांना  । मज वाटे आज मना

मदनाचे सैन्य जणु । शर जोडुन सज्ज सदा

 

मदनाचे पुष्पबाण । सज्जचि हे वेधाया

हाय! हाय!! हृदयांसी । हसत हसत सर्वांच्या

 

वार्‍यावर उधळतीच । सौगंधी अश्व दहा

वायुसवे सौरभ हा । रानभरी वावरला

 

कुहू कुहू चढत जाय । तानचि ही गगनाला

येण्याची ललकारी । विश्वजयी मदनाच्या

 

`परिवर्तनहाचि कुणी । पृथुल असा ऐरावत

पायघड्या पुष्पांच्या । चालतसे डुलत झुलत

 

डौलदार चाल छान । कनक छत्र सूर्य धरत

 

अंबारी नवअंबर । पवनराज चौरीधर

अवतरला पृथ्वीवर । कुसुमाकर दिमाखात

 

किलबिलाट भाट करत । मधुकर करि मधुगुंजन

पराभूत शिशिर घेत । माघारचि धरणीवर

---------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची


आंब्याची स्तुती करायचा मोह पूर्वजांनाही झाला .त्यांनी केलेली आम्रस्तुती मराठीतून येथे देते.

आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं

 प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |

आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां

श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||

 

पाणीपाणिच जाहले हृदय हे त्या नारळाचे कसे

सर्वांगी फणसाचियाच फुलला काटा कसा हा बरे ।

गेले ते फुटुनीच उंबर कसे; खाली झुके केळ ही

द्राक्षेही अति काळवंडुन कशी झाली मनाने खुजी ।।

 

झाले जांभुळ जांभळे नच कळे चाले मनी काय त्या

झाली मत्सरग्रस्त सर्वचि फळे वाटून हेवा तया ।

आहा! रंग सुगंध स्वाद भुलवी पंचेद्रिया आम्र हा

लोकांच्याच मुखातुनी स्तुति अशी ऐकूच येता सदा ।।

---------------------------------

 


बेशरमी

 

बेशरमी  

                    नगरला बदली झाली होती प्रवीण दीक्षितांची. आमचाही नुकता नुकता संसार सुरू झाला होता.  1981 ह्या वर्षी नगरला पहिले Additional S.P.   होण्याचा मान प्रवीण दीक्षितांना मिळाला कारण, नगरला  Additional S.P. ची पोस्टही नव्याने करण्यात आली होती. त्यामुळे बाकी पोस्टसाठी जशी राखीव अशी ठराविक घरं असतात तसं त्या पोस्टसाठी विशिष्ट घर नव्हतं. शोधाशोध करत रिकाम्या बंगल्यांपैकी एक ऐसपैस बंगला आम्ही निवडला. ओसाड असला तरी थोड्याफार डागडुजीने  राहण्यास चांगला होणार होता.  बंगल्याबाहेर असलेल्या प्रचंड आवारात अधुन मधून जांभळ्या फुलांची झुडपं अंगोपांग फुलली होती. ओसाडीपेक्षा बरी वाटली डोळ्याला. तेवढीच डोळ्यांना सुखावणारी हिरवाई आणि जांभळी फुलराई!

                   दुसर्‍या दिवशी बंगला पहायला गेलो तेंव्हा डागडुजी सुरू झाली होती. माळी येऊन बाहेरच्या आवारातील सर्व फुलांनी गच्च भरलेली झाडं  मूळापासून खणून काढत होता. बहुतेक झुडपं काढूनही झाली होती. `` अरेरे कशाला काढली ती!’’ न राहवून मी म्हणाले. त्यावर सगळे मलाच हसत म्हणाले, ``वहिनीबाय ती झाडं बेशरमीची होती. ती अशी घरात लावत नाहीत. ती गावाबाहेरच्या उकिरड्यावरची झाडं आहेत.’’ पूर्वी माणसाच्या काही जातींना वेशीबाहेर रहावे लागे. आता माणसांसोबत झाडांचीही हाकालपट्टी गावाबाहेर व्हावी? माणसांप्रमाणे झाडांनासुद्धा जाती जमाती असतात की काय? त्यांना सुद्धा वेशीबाहेर राहण्याची सोय करावी? उगीचच मनातल्या मनात मला राग आला. नंतर अनेकवेळा गाव संपलं की खरोखरच वेशीबाहेर उकिरड्यावर, दलदलीत उगवलेली अगोपांग जांभळ्या फुलांनी बहरलेली ही झाडं पाहिली की त्यांचं बेशरमी हे नावं मनाला डाचत असे. ह्या वनस्पतीला चांगलं नावं पाहिजे होतं. तिच्यावर अन्याय होतोय असं सारखं मनात येई मग वाटे ,

 

ती जरा आली फुलावर

तो घाव पडला मुळावर

घरच्या बगिचातून तिची

हकालपट्टी उकिरड्यावर

 

गावाबाहेर दलदलीवर

तरी वाढली भराभर

साधं फुलण्याच स्वप्न तिचं

मनी रुजलं होतं खोलवर

 

बहरणं तिचं अनावर

जाणार्‍याच्या नजरेवर

अधाशी नजरा तिला

डसत होत्या अंगभर

 

काटेरी जिभा तिला

ओरखाडत मनावर

तरी गावाची घाण झाकीत

बेशरमी फुलली अंगभर

फक्त- --- साधं फुलण्याच स्वप्न तिचं

साकारलं ------ पण? उकिरड्यावर!

 

----------------------------------------

  

             नंतर काही दिवसांनी बेशरमीचा पराक्रम कळला. आदिवासी भागात काम करणारी एक मैत्रिण तिचा अनुभव सांगत होती. तिला तिथल्या आदिवासी मुलीनी सांगितलेला,---

``बेशरमी ही फार विषारी वनस्पती आहे. तिच्या पानात गुंडाळून मासा तळला तर तो मासाही विषारी होतो. माणूस मरतो त्याने. पण त्या विषाने माशाची चव बदलत नाही.’’

मैत्रिण म्हणाली ``पण मग बेशरमीच्या पानात मासा तळायचाच कशाला ना?’’

 त्यावर निरागसपणे ती मुलगी उत्तरली, ``कधी कधी नवरा दारू पिऊन फार छळतो, कधी कधी दुसर्‍याच मुलीच्या प्रेमात पडतो किंवा कधी कधी आपल्यालाच दुसरा कोणी आवडतो -----!!!!! ’’

एकंदर बेशरमीचं नावं बदलावं असं परत कधी वाटलं नाही.

--------------------------------

 

लेखणी अरुंधतीची -