Friday 9 June 2023

चेहरे

 

चेहरे

डोळ्यापुढे तरळती कित्येक चेहरे हे

अस्पष्ट, स्पष्ट कोणी, झाले जरा पुसटसे

सन्दर्भ लागतो ना माझ्या मनात काही

परि घालतीच पिंगा माझ्याच भोवताली

 

नेत्रात चेहर्‍यांच्या किति भाव भावनांचे

लक्षावधी धुमारे करती मला इशारे

नव्हते कुणीच माझे नात्यातले जवळचे

परि---- प्रत्येक चेहर्‍याचे माझ्यासवेच नाते?

 

रागावला असा का? हा चेहरा कुणाचा

हा लाजरा कुणाचा मज नाव आठवेना

हा शांत शांत वाटे वात्सल्य त्यात दाटे

ओसंडतो मुखी का उत्साह मूर्त भासे

 

लावण्यपूर्ण कोणी हा देखणा रुबाबी

कोणी खुशालचेंडू त्रासीक हाचि भारी

त्यांनाच जोडलेले, क्षण हे कितीक माझे

घेऊन जाय मजला कित्येक वर्ष मागे

 

प्रत्येक चेहरा हा ,उमटवे ठसा स्वतःचा

कोर्‍याच जीवनपटी; तो एकमेव त्याचा

कशिद्यात गुंफलेले चेहरे नक्षिमधले

 वस्त्रास जीवनाच्या देऊन रंग गेले

 

मुखचंद्रमा कुणाचा, मागे वळून पाहे

प्रत्येक चेहर्‍याच्या मागे दडून राहे

डोळ्यात खोडकर तो मज भाव गोड मोहे

मी पाहता लपे तो, हासून लक्ष वेधे

 

मी शोधते तयाला तो सापडे न कोठे

लपुनी मलाच सांगे माझेच चेहरे हे

असती किती अनंत; चैतन्य मी तयांचे

हे विश्वरूप तेव्हा, माझे मलाच कळले

-------------------------------

लेखणीअरुंधतीची-

No comments:

Post a Comment