Wednesday 21 June 2023

थेंबुटला

थेंबुटला

 

पावसाची सर येऊन गेल्यावर  तारेवर मोत्यासारखे लोंबणारे पावसाचे थेब असोत वा नळाला खाली लोंबणारा पाण्याचा थेंब असो.  खाली पडण्यापूर्वी सार्‍या जलकणांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकमेकांना सावरून धरणं मोठं बघण्यासारखं असतं. वार्‍याच्या मंद झुळकेवर लवलव हलणारे हे जलथेंब कितीवेळ  तारेवर चालणार्‍या डोंबार्‍याच्या मुलीप्रमाणे स्वतःचा तोल सांभाळत असतात.  स्वतःला आवरून सावरून  सगळे जलकण थेबांच्या पृष्ठभागावर, थेंबाभोवती स्वतःच्याच जलकणांचं पातळ रबरासारखं ताणलं जाणारं आवरण तयार करतात.(surface tension)  जेवढ्या शक्य असतील तेवढ्या जलकणांना सामावून घेतात. न पडता लोंबत राहतात...... त्याचा  लांबट थेंबुटा आकार होऊन त्याचा पाण्याचा देठ तुटेपर्यंत.....!

 

थेंबुटला तो जलकणिकांचा

आधाराने उगी कशाच्या

लोंबत राहे किती काळचा

सावरुनी जल-कणिका सार्‍या .......1

 

एक एक जल कणिका मिळता

होत जातसे लांब नि मोठा

लंबगोल त्या द्राक्षांसम हा

न पडता चिकटून आधारा ........2

 

पडेन मी हो खाली निश्चित

पडून होतिल शकले शत शत

मनात त्याला आहे माहित

जलकणिका परि राहे जमवत .........3

 

जलकणिकांची खोळ करोनी

ठेवी सारे जलकण बांधुनि

 वारा हलवी मोट तयांची

डुलु डुलु हाले हळु सांभाळुनि .........4

 

प्रकाशरेषा जाता त्यातुन

सप्तरंग फाकवीच अद्भुत

सहस्ररश्मी तोही पाहे

जलथेंबातचि मुख मनमोहक ........5

 

हात सुटोनी आधाराचा

विदीर्ण होई जलकण अवघा

आप्तांसंगे क्षण शेवटला

उपहासाने मरणा हसला .........6

---------------------------------

लेखणी अरुंधतीची -


No comments:

Post a Comment