Wednesday, 21 June 2023

लेक

 

लेक

संपली नाही कधी जिच्या प्रेमाची शिदोरी

घडी घडी रुसे ती माय माझ्यावरी

डोळा आणि पाणी नाही विचारीत कोणी

माझ्या घरात आता मी झाले पाहुणी

होती करारी एकदा हर कामात हुन्नरी

कारणाविना का रुसे ही माय वारंवारी?

मिटल्या काळज्या तृप्त असे ही संसारी

काय झाले हिला का झाली ही म्हातारी?

म्हातारपण जीवाचे दुसरे बालपण

आठविता हे वचन सुटले माझे प्रश्न

तेच नाटक जीवनाचे भूमिका बदलल्या

माय लेकिंच्या भूमिका उलट वटविल्या

मी माय तिची झाले ती लाडकी लेक माझी

आगळी लाभली लेक मला अचानक आजी

भूमिका बदलता माझी दृष्टी बदलली

नवी लेक माझी मी कौतुके न्याहाळली

धोक्याचे वय हिचे मला लागली काळजी

काही झालं तरी लेक लाडकी माझी

घेतले ओंजळीत तिचे मुख सुकलेले

लख्ख वाचले माझ्यातल्या आईने तिचे डोळे

निरागस मुखावर तिच्या हसु फिक्कुटले

त्याने माझे मन अंतर्यामी ढवळले

उन्हे कलली अवेळी वारे सुटले हिवाळी

सखा भेटाया उतावळा लेक माझी बावरली

झाला मनाचा थरकाप ताटातुटीच्या विचाराने

हात ठेविता पाठीवर डोळे भरले पाण्याने

माझा निरोप घेता ही जाईल सासरी

मग कध्धी कध्धी ना भेटणार असे काग सांग पोरी?

उठुन आवेगाने तिला घेतले जवळी

नको रडू अशी बाळे आयुष्याच्या सांजवेळी

 

-----------------------------------------------------

 

माझा आज्ञाधारक गोड मुलगा

 

माझा आज्ञाधारक गोड  मुलगा


माझा आज्ञाधारक गोड मुलगा

माझ्या समोर घुश्यात उभा होता

ताड माड वाढला तरी

गाभ्यात केळी सारखा कोवळा होता

 

मऊ मखमलीचा ओठावर

अम्मल अम्मळ वाढला होता

मृदु मुलायम गालांवरती

रंग सावळा चढला होता

 

फुणफुणत होता तणतणत होता

जाब मला विचारत होता

शब्द प्रयोग जमला तरी

अर्थ त्याला उमगला नव्हता

 

``सारख तुमचच ऐकायच

मला नाही जमायचं

सदान् कदा उपदेश

मला नाही चालायचं

 

माझ्या हिताची चिंता

तुम्ही आता बास करा

मोकळेपणी मला आता

आयुष्य माझे जगु द्या”


भाल्यासारखा शब्द त्याचा

चिरत होता रुतत होता

तरीही--

आठवणींना शोधत सांधत

भूतकाळात नेत होता

 

आठवणींच्या त्याच ओघात

मन पोचलं इतिहासात

वर्तमानातील हेच नाट्य

अनुभवलं मी भूतकाळात

 

आठवलं मला माझं `ते'

पहिलं उद्धट उत्तर

आई होती थरथरत

आणि बाबा होते गुरगुरत

 

तोच - -

 

काठीनी तोल साधत

सुरकुत्यांमधून निरखत

प्रसंगाला नीट सावरत

आजी म्हणाली हसत हसत,

 

``बिंदल्या मनगट्या वाळे

काळजी कौतुकानी घातले

आता अम्मळ अव्वळ झाले

बाळाला रुतु लागले --

 

सोनारानी कापण्या आधी

हळुवार घ्या काढून

त्याला जरा मोकळं वाटेल ! ''

 

सारा इतिहास आठवून

मी हासलो खळाळून

पोर गेला बावरून

चालणार नव्हतं आता मला

जराही हार मानून!

 

विचार करून क्षणभर

थोपटलं त्याला पाठीवर

-        -आत्तापर्यंत जो हात

होता त्याच्या पाठीवर

किंचित उचलला आणखी वर

आणि - -

ठेवला त्याच्या खांद्यावर!

------------------------------------------------

 

#लेखणीअरुंधतीची -

थेंबुटला

थेंबुटला

 

पावसाची सर येऊन गेल्यावर  तारेवर मोत्यासारखे लोंबणारे पावसाचे थेब असोत वा नळाला खाली लोंबणारा पाण्याचा थेंब असो.  खाली पडण्यापूर्वी सार्‍या जलकणांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकमेकांना सावरून धरणं मोठं बघण्यासारखं असतं. वार्‍याच्या मंद झुळकेवर लवलव हलणारे हे जलथेंब कितीवेळ  तारेवर चालणार्‍या डोंबार्‍याच्या मुलीप्रमाणे स्वतःचा तोल सांभाळत असतात.  स्वतःला आवरून सावरून  सगळे जलकण थेबांच्या पृष्ठभागावर, थेंबाभोवती स्वतःच्याच जलकणांचं पातळ रबरासारखं ताणलं जाणारं आवरण तयार करतात.(surface tension)  जेवढ्या शक्य असतील तेवढ्या जलकणांना सामावून घेतात. न पडता लोंबत राहतात...... त्याचा  लांबट थेंबुटा आकार होऊन त्याचा पाण्याचा देठ तुटेपर्यंत.....!

 

थेंबुटला तो जलकणिकांचा

आधाराने उगी कशाच्या

लोंबत राहे किती काळचा

सावरुनी जल-कणिका सार्‍या .......1

 

एक एक जल कणिका मिळता

होत जातसे लांब नि मोठा

लंबगोल त्या द्राक्षांसम हा

न पडता चिकटून आधारा ........2

 

पडेन मी हो खाली निश्चित

पडून होतिल शकले शत शत

मनात त्याला आहे माहित

जलकणिका परि राहे जमवत .........3

 

जलकणिकांची खोळ करोनी

ठेवी सारे जलकण बांधुनि

 वारा हलवी मोट तयांची

डुलु डुलु हाले हळु सांभाळुनि .........4

 

प्रकाशरेषा जाता त्यातुन

सप्तरंग फाकवीच अद्भुत

सहस्ररश्मी तोही पाहे

जलथेंबातचि मुख मनमोहक ........5

 

हात सुटोनी आधाराचा

विदीर्ण होई जलकण अवघा

आप्तांसंगे क्षण शेवटला

उपहासाने मरणा हसला .........6

---------------------------------

लेखणी अरुंधतीची -


Tuesday, 13 June 2023

माझा गाव

 

माझा गाव 

             लग्नात लाह्या मागे उधळत पुढे पुढे जायचा विधी आटोपला. लाह्या मागे टाकतांना ``मागे पाहू नकोस हं !’’ सासरकडच्या कोणी तरी  पोक्त बाई बोलल्या.  माहेर आणि त्या सोबत आपला गाव सुटल्याची जाणीव  झाली. आणि मग देशभर भटकंती सुरू झाली.

पोटासाठी भटकत किती दूर देशी फिरेन,

मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी फिरेन'

                    असं कवितेच्या ओळींचा हात धरून फिरता फिरता गाव मागे पडला. धावपळीत भेटी झाल्या तरी गावाला परत निरखून पहायला मधे वीस वर्षे गेली.  वीस वर्षांनंतर आपला(?) तोच गाव पाहतांना मी बघतच राहिले

 

 

 

मी गाव सोडिला माझा

त्या लोटली वर्षे वीस

परतून  पाहता त्यासी

फिरले जादूचे का पीस ।।

 

बदलले गाव ते सारे

ते अबलख रुपडे न्यारे

 मी चकित विस्मये  झाले

अन बघत राहिले सारे ।।

 

 

उलगडला मनीचा गाव

ठेवला पुढ्यात गावाच्या

लवभर ना जुळल्या खुणा

-- परी तेच अक्षांश रेखांश  ।।

 

इतिहासाचे साक्षी वाडे

इतिहासात जमा झाले

स्वप्नांना जे ना सुचले

ते प्रत्यक्षी अवतरले।

 

अंगणांच्या घालून घड्या

मिरवतीच त्यावर माड्या

छाटून तरु गर्द पिसारे

पळताती त्यावर गाड्या।

 

ही घरेच घरे उगवली

झाकल्या हरित टेकड्या

हरवल्याच वाटा सार्‍या

अन !  हिरवळींच्या पायघड्या।

 

भुइसपाट डोंगर झाले

उभ्या जाहिरातींच्या गुढ्या

कशी अनोळखी मी उभी

दुनियेत नव्या बेगड्या।

 

हा कसला उरुस  उसळला

 - जणु कावळ्यांची भरली शाळा

वेगाने किति देहचि पळती

परि आत्माच तो हरवला।

 

मी टिपून डोळे माझे

मम मनास बोलले वेड्या

का उदास होसी असा ?

बदलले मी ही ना रे गड्या।

 

बदलाच्या लाटेवरती

जग झाले स्वारचि सारे

गतकाळास धरू जाता

हो फरपट एक खरी रे।

 

मग ती नवी स्वप्न नगरी

मी फिरले जरा जराशी

हृदि तुलना जरा केली

तिचि मनातल्या गावाशी।

 

घेउन निरोप गावाचा

मी चालले दूर देशी

मी गाव पाहिला नवा

ही मनात न्यारी खुशी!

------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची