Tuesday, 9 May 2023

शाळा

 

शाळा

दहावी, बारावी मग कुठल्या कुठल्या कोर्सेस साठीच्या परीक्षा, नव नव्या कोर्सेच्या अडमिशन्स, त्यांच्या परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यू, मग जीवघेण्या डेड लाईन्स, त्यांची परिपूर्तता करण्यासाठी रात्रीचे दिवस करणे, पूर आलेल्या नदीसारखी आयुष्यातील वर्ष धावत असतात पुढे पुढे पुढे ---. शैशव, तारुण्य तर कधीच एका सपाट्यात धुवून नेतात. संसार, मुलबाळं ------!----ह्या चाकोरीतून जऽऽरा श्वास घेत मागे वळून बघावं तर आठवणींच्या धुक्यात लपेटलेली एक धूसर इमारत दिसायला लागते. उगीच भास होतो कोणीतरी खांद्यावर हात टाकल्याचा. कानावर हाळी येते--- साईऽऽसुट्ट्योऽऽऽऽऽऽऽ! मन न कळत गुणगुणायला लागत, -

मात्रा  - 8 : 8 : 11

जिथुन घेतली, उंच भरारी, नभ स्पर्शाया काल

जिथुन पांगले, सवंगडी ते, जिवलग दोस्त लहान

मने कोवळी, जेथे घडली, कणखर निडर सुजाण

त्या शाळेचे, अढळ राहिले, हृदयी माझ्या स्थान  ।। 1 ।।

 

कबड्डि खोखो,  सागरगोटे, जोडिसाखळी खास

खेळ खेळलो, मैत्रिणींसवे, हरपुन आम्ही भान

जल्लोशाने, दुमदुमले जे, शाळेचे मैदान

नंदनवन ते, आजही वाटे, त्यास कसे विसरेन ।। 2 ।।

 

खांद्यावरती, हात ठेवता, आड न आली जात

रंक राव हा, कधी न शिवला, मनास भेदाभेद

संस्कारांनी, जिथे घडविले, विद्यार्थ्यांस समान

त्या शाळेचे, अढळ राहिले, हृदयी माझ्या स्थान ।। 3 ।।

 

विस्फारुन ते, नेत्र चिमुकले, होऊन रोमांचित

जिथे वाचले मी चांदोबा, सिंदबाद अन् टार्झन

अत्रे, तांबे, खांडेकर हे लेखक सुनामांकित

वाचनालयी, मन त्या धावे, आज सान होऊन ।। 4 ।।

 

मने निरागस निर्मळ मैत्री स्वार्थ न शिवला जेथ

आनंदाची उत्साहाची रोज घडे ती भेट

वर्षे सरली तपे लोटली तरिही लागे ओढ

त्या शाळेचे हृदी वाटते मोल मला अनमोल ।। 5 ।।

----------------------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

विठ्ठलापादपद्मी

 

( वृत्त- मालिनी ; अक्षरे - 15 ; गण-  न न म य य ; यति 8,7 )

 

सुटत सुटत जावे पाश हे बंधकारी

पुसट पुसत जावे चेहरे भोवताली

सतत सतत चित्ती विठ्ठला रे तुझेची

ठसत ठसत जावे रूप लावण्यखाणी

 

किरण जरि जलासी भेदूनी पार जाती

भिजति नच कधी ते वृत्ति राहो तशी ती

भिजति कमलपत्रे ना कधी नीरसंगे

असुन सकल आप्तांसोबती मी नसावे

 

कुरतडुन मनाचा कोश मी रे उडावे

मऊ मऊ घरट्यासी सत्वरी मी त्यजावे

मम मम मम माझे मीच दूरी करावे

तन मन कृतिने मी पांडुरंगी रमावे

 

सहज विलग होता फूल देठामधूनी

परिमल नच ठेवी आपुल्या गंधकोशी

मनसुमन तसेची सोडुनी देहबुद्धी

सहज गळुन जावे विठ्ठलापादपद्मी

-------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

 

Monday, 8 May 2023

पिटुक खेकडा

 

पिटुक खेकडा

सागरतीरी पुळणीवरले

कण वाळूचे इवले इवले

 सांधुन बांधुन लाडू केले

जमिनीखाली घर बांधियले

 

घराभोवती कुंपण रचले

अलगद ठेऊन लाडू इवले

प्रवेशद्वारा छान सजवले

पिटुक खेकड्याने सुंदरसे

 

सुबक बोगदा बनवी इवला

लगबग शिरतो त्यात चिमुकला

पळता पळता पटकन लपला

खेकडुला तो इवला इवला

 

गुप्त भुयारी लपुन बैसला

पाहे डोकावुनी सानुला

पूर्ण मोकळे असे पटांगण

पाहुन आला खेळायाला

 

लाट अजुन ती नाही आली

तोवर वाळूवर ये फिरुनी

फिरता फिरता उमटे नक्षी

वाळूवरती छान सुबकशी

 

बघा काढले चित्र म्हणे मी

टाळ्या पिटुनी पिटुक सौंगडी

सर सर सर आली आली

लाट घेऊनी जल ते वेगी

 

टकमक पाहे पिटुक लपोनी

लाट जातसे चित्र पुसोनी

घर वाळूचे वाहून नेई

लाडू सारे खाउन जाई

 

पिटुक बांधतो पुन्हा नव्याने

वाळूखाली घर ते त्याचे

पुन्हा वाळुच्या लाडुंचे त्या

कुंपण त्यासी करुन चांगले

 

खेळ खेकडा अन लाटेचा

रोज चालतो पुन्हा पुन्हा हा

कोण जिंकले कोण हारले

विचारती ते रोज सागरा

 

सागर हसतो खळाळुनी तो

दोघा वाटे मीच जिंकलो

बघते मी तो कितीक वर्षे

आजही चालू खेळ तोच तो

-------------------------

लेखणीअरुंधतीची -