Tuesday 9 May 2023

शाळा

 

शाळा

दहावी, बारावी मग कुठल्या कुठल्या कोर्सेस साठीच्या परीक्षा, नव नव्या कोर्सेच्या अडमिशन्स, त्यांच्या परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यू, मग जीवघेण्या डेड लाईन्स, त्यांची परिपूर्तता करण्यासाठी रात्रीचे दिवस करणे, पूर आलेल्या नदीसारखी आयुष्यातील वर्ष धावत असतात पुढे पुढे पुढे ---. शैशव, तारुण्य तर कधीच एका सपाट्यात धुवून नेतात. संसार, मुलबाळं ------!----ह्या चाकोरीतून जऽऽरा श्वास घेत मागे वळून बघावं तर आठवणींच्या धुक्यात लपेटलेली एक धूसर इमारत दिसायला लागते. उगीच भास होतो कोणीतरी खांद्यावर हात टाकल्याचा. कानावर हाळी येते--- साईऽऽसुट्ट्योऽऽऽऽऽऽऽ! मन कळत गुणगुणायला लागत, -

मात्रा  - 8 : 8 : 11

जिथुन घेतली, उंच भरारी, नभ स्पर्शाया काल

जिथुन पांगले, सवंगडी ते, जिवलग दोस्त लहान

मने कोवळी, जेथे घडली, कणखर निडर सुजाण

त्या शाळेचे, अढळ राहिले, हृदयी माझ्या स्थान  ।। 1 ।।

 

कबड्डि खोखो,  सागरगोटे, जोडिसाखळी खास

खेळ खेळलो, मैत्रिणींसवे, हरपुन आम्ही भान

जल्लोशाने, दुमदुमले जे, शाळेचे मैदान

नंदनवन ते, आजही वाटे, त्यास कसे विसरेन ।। 2 ।।

 

खांद्यावरती, हात ठेवता, आड आली जात

रंक राव हा, कधी शिवला, मनास भेदाभेद

संस्कारांनी, जिथे घडविले, विद्यार्थ्यांस समान

त्या शाळेचे, अढळ राहिले, हृदयी माझ्या स्थान ।। 3 ।।

 

विस्फारुन ते, नेत्र चिमुकले, होऊन रोमांचित

जिथे वाचले मी चांदोबा, सिंदबाद अन् टार्झन

अत्रे, तांबे, खांडेकर हे लेखक सुनामांकित

वाचनालयी, मन त्या धावे, आज सान होऊन ।। 4 ।।

 

मने निरागस निर्मळ मैत्री स्वार्थ शिवला जेथ

आनंदाची उत्साहाची रोज घडे ती भेट

वर्षे सरली तपे लोटली तरिही लागे ओढ

त्या शाळेचे हृदी वाटते मोल मला अनमोल ।। 5 ।।

----------------------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment