Tuesday 9 May 2023

विठ्ठलापादपद्मी

 

( वृत्त- मालिनी ; अक्षरे - 15 ; गण-  ; यति 8,7 )

 

सुटत सुटत जावे पाश हे बंधकारी

पुस पुसत जावे चेहरे भोवताली

सतत सतत चित्ती विठ्ठला रे तुझेची

ठसत ठसत जावे रूप लावण्यखाणी

 

किरण जरि जलासी भेदूनी पार जाती

भिजति नच कधी ते वृत्ति राहो तशी ती

भिजति कमलपत्रे ना कधी नीरसंगे

असुन सकल आप्तांसोबती मी नसावे

 

कुरतडुन मनाचा कोश मी रे उडावे

मऊ मऊ घरट्यासी सत्वरी मी त्यजावे

मम मम मम माझे मीच दूरी करावे

तन मन कृतिने मी पांडुरंगी रमावे

 

सहज विलग होता फूल देठामधूनी

परिमल नच ठेवी आपुल्या गंधकोशी

मनसुमन तसेची सोडुनी देहबुद्धी

सहज गळुन जावे विठ्ठलापादपद्मी

-------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment