Wednesday 10 April 2024

कडुनिंब

कडुनिंब

 

मज दिसे काहिसा, हसरा बालक,  कडुनिंबाच्या रूपे

तो हसे अभावित, हलवित पाने, नित्य निरागसपणे

 

इवली इवली पाने आणिक, इवली इवली फुले

निंब दरवळे मंद मंदसा, आसमंत परिमळे

 

ह्या चांदोबाला दडायलाही, कडुनिंब बहु आवडे

का लपाछपीचा खेळ खेळण्या, सवंगडी हा रुचे

 

पानापानातुनी पवन हा, मासोळीसम पळे

लिंबोळ्यांच्या थेंबुटल्यांचे हलवित गोंडे पिवळे

 

बहु ताना घेई गोड गुलाबी उषःकाली बुलबुल

ह्या निंबावरती झोके घेतचि मधु आनंदे मंजुळ

 

लुटु लुटु हलते झाडावरती निंबोळ्यांची नक्षी

तांबुस वर्णी दिसे पालवी चैत्राची जी साक्षी

 

लडिवाळ सोबती सुंदर झिपरा अंगणी माझ्या गुणी

आनंदाचे निधान माझ्या शरण निदाघा आणी।।

 

--------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

 

 


Wednesday 28 February 2024

फरक

 

फरक

निष्पर्ण तरूवर एकावेळी । अंकुरती कोब किती ते

ते ताम्र कोंब पालवती सारे । बस आज उद्या फरकाने

 

लसलसती पर्णे, लाल गुलाबी । पोपटीच चमचमणारी

ती नटती हिरव्या गहिर्‍या रंगी । बस आज उद्या फरकानी

 

बहरतोच तरुवर एकावेळी । किति मोहक रंगफुलांनी

उमलत जाती फुले तरूवर । कुणि आधी कुणी नंतरी

 

तो बहर ओसरे एकावेळी । कोमेजति हासरी फुले

झरझर झरती ती झाडापायी । परि आज उद्या फरकाने

 

तरुवरती हळु हळु दिसू लागती । मग घोस फळांचे उमदे

सारे पिकती एकावेळी परि, । पळ आधी नंतर असे

 

बहर संपता परि फुलाफळांचा । दमलेली उरती पाने

क्लांत पर्ण ते विश्रांतिस्तव  । क्षण सोबत बसती सारे

 

जणु कृतार्थतेच्या अपूर्वरंगी । पळ दो पळ खचित निथळती

मग निरोप घेती परस्परांचा । बस आज उद्या फरकानी

 

ती पाने पिवळी लाल मनोहर । निस्तेज क्लांतशी होती

हळु देठ सुटुनिया भिरभिरताती । कुणि आधी कुणी नंतरी

-----------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Tuesday 6 February 2024

सम्मेलन

सम्मेलन

झाडावरून गळून पडलेल्या पानांचं

एकदा झाडाखालीच सम्मेलन भरलं

कोणाचे देठ, कोणाचा काठ, कोणचं टोक तुटल्याने

कोणीच कोणाला ओळखत नव्हतं

 

परत नव्याने स्वतःची ओळख करून द्यावी

असं  मग सर्वांनुमते ठरलं

आणि सर्वात आधी बोलायला

एक गळलेलं पान उभ राहिलं.

 

‘‘साक्षात सूर्यदेवांच्या स्वागताच्या कमिटिवर

माझं नाव पहिलं होतं.

मला हस्तांदोलन केल्याशिवाय

चंद्रानीही कधि आकाश सोडलं नव्हतं.’’

 

आज मात्र बोलताना ते, बर्‍यापैकी थरथरत होतं

झाडापासून सुटल्याने जरा सैरभैर वागत होतं.

बाकीच्यांच्या आधारनी तेही खाली बसलं.

सार्‍यांनी टाळ्या वाजवत त्याच स्वागत केलं.

 

‘‘माहित आहे, कधी एकेकाळी हे शेंड्यावरचं पान होतं’’

हळुच एक पान दुसर्‍याच्या कानात कुजबुजलं

‘‘तेव्हा त्याने कधी खाली डोकावून आपल्याकडे नाही पाहिलं

आज मात्र तोरा उतरून जमिनीवर आमच्याच सोबत पडलं’’

 

“इश्श्य!” म्हणत मग एक वाळकी पर्णिका बोलु लागली,

माझ्या गुलाबीसर चमकदार रंगांवर दुनिया फिदा होती

शेंड्यावरच्या पानानेही ओळखलं नाही; ती त्याचीच सखी होती

त्याच्याच हातात घालून तीही उत्साहाने सळसळली होती

 

प्रत्येकजण झाडाला मोठं करण्यात झटला होता

शोभा वाढवत झाडाची सारं आयुष्य जगला होता.

नवीन चमकदार पोपटी पालवीने झाड बहरून गेलं होतं

सळसळणार्‍या नूतन पल्लवांना पाचोळ्याशी काहीच देणंघेणं नव्हतं

 

वहिवाटीचा रस्ता झाडाखालूनच जात होता.

येणार्‍या जाणार्‍याच्या पायदळी अनेकांचा चुरा होत होता

थोड्याच दिवसात पानझडीत नव्याने पानं गळणार होती

झाडाखालीच सम्मेलन भरवून आपली यशोगाथा सांगणार होती

--------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

Thursday 1 February 2024

मोठ्यांची भाषा

 

मोठ्यांची भाषा


कधी कधी ही मोठी माणसं , काहीतरी भलतच बोलतात

असं कसं मला नेहमी, मोठ्या मोठ्या कोड्यात पाडतात

 

आई म्हणते सीताफळं, मोठ्या डोळ्यांचीच चांगली असतात

प्रश्न पडतो मला मग, इतक्या डोळ्यांनी कशी पाहतात?

 

प्रत्येक डोळ्यानी वेगळं पाहून , सरळ चालू शकतील का  

विचारताच मी दटावते आई , डोळे मोठ्ठे करून मला 

 

गुलाबाचा डोळा आबा ,   गांधारीसारखा बांधून ठेवतात.

'' फुटला आता छान'' म्हणत , हळुच त्याची पट्टी सोडतात

 

 चांगल्या डोळ्यावर बांधतात पट्टी, डोळा फुटल्यावर मात्र काढतात का

मोठ्यांचं हे वागणं बोलणं , विपरीत नाही का? तुम्हीच सांगा

 

थंडीने अंगावर आला काटा तर, आई  घालते मला स्वेटर

गुलाबाला बागेमधल्या, मात्र बांधत नाही कधी मफलर

 

जरा नाकाला आलं पाणी तर, आई लावते व्हिक्स बाम

चिक येतो म्हणून काढून टाकते, आंब्याचं तर पुरतच नाक

 

चाफेकळीचं नाक काय , हुंगत बसत त्याचाच सुवास?

विचारलं तर आजी म्हणते, असे प्रश्न कसे सुचतात?

 

आपल्यासारखच ऐकू येतं ,  का हो बाबा गोकर्णाला?

बाबा म्हणतात, बच्चमजी, बसा आता अभ्यासाला

 

लव असलेला भोपळा काकडी । आई म्हणते कोवळे असतात

दूध पीठ लावून बाळा । रोज का मग न्हाऊ घालतात?

 

बाळासारखी चावता मुंगी , अचानक मला जोरात हाती

 ``येत असतील  तिला दात नवे'' , म्हणता खो खो हसते ताई

 

``कसा रे तू गोंड्या माझा'', म्हणत पापा घेते आजी

मोठ्यांची ही वेगळी भाषा, कळत नाही मला कशी?

-------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 


Thursday 25 January 2024

हे मन्दिर श्रीप्रभु रामाचे

 

हे मन्दिर श्रीप्रभु रामाचे

 

हे मन्दिर श्रीप्रभु रामाचे

हे पाउल एक महत्त्वाचे

सुनिश्चित ध्येय सुपथावरचे

हे स्फूर्तिस्थानचि सर्वांचे ।। 1

 

इतिहासचि उज्ज्वल तो अमुचा

विपरीत करुन जरि सांगितला

रक्तातुन सळसळतो अमुच्या

जाईल पुढेचि पिढ्यानु पिढ्या ।। 2

 

कोदंडधरासी स्मरा स्मरा

ते निर्णय त्याचे अभ्यासा

लावा शास्त्रांचा अर्थ पुन्हा

वेळीच ओळखा खल-खेळ्या ।। 3

 

ते राक्षस निर्दय घोर अती

तैशाच स्त्रिया त्यांच्या असती

लवलेश मनी ना वात्सल्या

ऋषि-रक्तासाठी चटावल्या ।। 4

 

असु देकितीही हीन कृती

करण्या न कधी त्या डगमगती

असुर धाडती पुढतीच स्त्रिया

कारण शास्त्री ना वध्यचि त्या ।। 5

 

गर्जलाच विश्वामित्र तदा

``ह्या स्त्रियाच अनीतिच्या पुतळ्या

अधमास अधम हा धर्म खरा

अपराध घोर ना क्षम्य कुणा ।। 6

 

हा न्याय नसे अन्याय हा

बघतोस कसा क्षत्रीयवरा

उचल धनू शर लाव तया

नीचासी वधणे धर्म तुझा ।। 7

 

संदेह मनि ना धरी जरा

खल स्त्रीही वध्य असे वीरा ’’

ती दुष्ट त्राटिका कोसळता

करि हाहाकारचि खल सेना ।। 8

 

धावली जानकीवर जेव्हा

खाऊन टाकण्या शूर्पणखा

सौमित्र कचरला नाचि जरा

करण्यास कुरुप त्या महिलेला ।। 9

 

``अपहार धनाचा नारीचा

हा असुरधर्म’’ रावण वदला

संहार करुन त्या अधमाचा

सैन्यासह धाडी यमसदना ।। 10

 

ना क्षमा अहिंसा उपयोगी

डसणार्‍या जहरी सर्पासी

जिंकूनही शत्रूसीच क्षमा

हा धर्म न शास्त्री सांगितला  ।। 11

 

हे मन्दिर ना प्रभु रामाचे

प्रभुरामचि येथे अवतरले

कर्तव्य पथावर ना ढळणे

मिळमिळीत अवघे त्याज्य असे ।। 12

 

 

ही हिंदु अस्मिता धगधगती

दृष्टीस दिसे जरि राख वरी

ही फुंकर एक तयावरची

छेडेल तया करि भस्म पुरी ।। 13

 

हे राउळ श्रीप्रभु रामाचे

हे पाउल एक महत्त्वाचे

सुनिश्चित ध्येय सुपथावरचे

हे स्फूर्तिस्थानचि विश्वाचे ।। 14

--------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Monday 8 January 2024

रामजन्मभूमी

 

रामजन्मभूमी

 

वृत्त - अश्वधाटी/ मंदारमाला

 

तो आमुचा रामराजा जिथे जन्मला; वंद्य ती पुण्य भूमी अम्हा

जी जाहली रामचंद्राचिया पावलांच्या धुळीने पवित्रा धरा

ती अस्मिता आमुची देतसे धैर्य उत्साह अन् तेज आम्हा महा

ती जन्मभू राघवाची पहा मुक्त झाली यशोमंदिरा निर्मिण्या ।।

 

नाही घडी हीच सामान्य हो; प्राण गेले किती मोजले ना अम्ही

अन्याय तो घोर त्या कत्तली, हाल ठेवीयले ते जपोनी हृदी

त्याच्याच त्या ठाम पायावरी आज ह्या मंदिरा देउ आकारची

कोदंडधारी छबी राघवाची चला स्थापुया मंदिरी साजिरी ।।

 

डोलेल डौलात ती केशरीशी ध्वजा साजिर्‍या मंदिराच्या शिरी

जातील आनंदुनी कोटिच्या कोटी ती पोळलेली मने मौनची

दीपोत्सवाच्या प्रकाशी अयोध्या पुन्हा आज होईल तेजस्विनी

लावून घ्या हो हृदीचेच हे दीप तेजावरी त्याच तेजावरी ।।

---------------------------

 

             ( वृत्त- मंदारमाला /अश्वधाटी ; अक्षरे- 22; गणत त त त त त त ग; यति- 4, 6, 6, 6 )


Monday 27 November 2023

भारंड

नृत्य शिकणार्‍या मुलीने मला भतनाट्यम नृत्यातील "रुंडभारुंड"ची हस्तमुद्रा करून दाखली. आणि मला त्या काल्पनिक पक्ष्याचा फोटोही दाखवला. मला पंचतंत्रातील गोष्ट माहित होती. दोघींना  नवीन माहिती मिळाली.



पक्षी होता एक तयाचे नाव असे भारंड

दोनच होते पाय तयाला दोनच होते पंख

दोन शिरे अन दोनचि माना। पोट  तयाला एक

दोन दिशांना तोंडे परि ती । भांडण त्यांचे नित्य

 

सागरतीरी हिंडत होता । भक्ष्याच्या शोधात

लाटांवरुनी तोच तरंगत । कुठलेसे आले फळ

एक चोच ती पकडे फळ ते । रसाळ अन् आकर्षक

पहिले मुख ते खाता वदले । स्वादिष्ट जणु अमृत

 

खाइन अर्धे देइन अर्धे माझ्या मीच प्रियेस

दुजे तोंड ते वदे तयासी । मजला ही दे घास

रसाळ फळ ते कणभर मिळता   शमेल जिह्वालौल्य

सुखदुःखे ही एक आपुली । तृप्ती अपुली एक

 

परि दुर्लक्षुन दुजास तोची । वागे तसा खुशाल

फळ अर्धे ते खाऊन त्याने । दिले प्रियेसी खास

आनंदुन ती खाई फळ ते । दुजाकडे ना लक्ष

हिरमुसले मुख विरक्त झाले । सोसून तिरस्कार

 

परी अंतरी पेटुन उठले । घेऊ कसा प्रतिशोध

वेळ येऊ दे मग मी त्याला । दाविन इंगा थोर

एके दिवशी दिसली त्याला विषवल्ली ती एक

लटकत होती फळे तियेला । जणु दुजेच हालाहल

 

विवेक सुटला त्याचा पुरता रागाने तो अंध

तारतम्य ना तया राहिले झेपावे त्वेशात

तोडुन घेता फळ चोचीने  दुजा करी आकांत

अविचाराने घडेल तुझिया दोघांचाही अंत

 

दुर्लक्षूनी तयास रागे खाई फळ भारंड

एक यातना दोघांनाही तडफडती ते मूर्ख

एकच होते भाग्य तयांचे अन मरण एकसाथ

आडमुठ्यांना देहांताची   लिहिली शिक्षा एक

 

------------

मला विचारे गोष्ट ऐकुनी ।  छोटी माझी नात

गोष्टी मधला वेडा पक्षी  । आजी! आहे ना खोटाच?

 

नाही बाळे आजही आपण वंशज ह्याचे थोर

जाती पाती धर्म वेगळे । परि देश आमुचा एक!

 

माहित आहे जरी अम्हासी । धरतो एकचि हट्ट

आणि भांडतो घेण्यासी जणु । नरडीचा का घोट

 

गिरवित कित्ता भारंडाचा कधि न शहाणे होत

दोघांचाही अंत बरोबर माहीत जरि हे सत्य!!

 

-------------------------------

#लेखणीअरुंधतीची -