रानकेळ
फाट आता टराटर
नाही दया तुफानाले
हाले बाभयीचं पान
बोले केयीच्या पानाला
बाभळीचं पान काहीही म्हणो; ‘‘कावळ्याच्या शापानी गाय मरणार
नाही आणि बाभळीच्या दुस्वासाने केळ फाटणर नाही’’ अशा तोर्यात मुंबईला माझ्या घराच्या
समोरच्या टेकडुलीवर रानटी केळाची काही रोपटी दगडाच्या सरळ चढणीवर दगडांच्या खोबणीत
उगवली होती. सर्वसाधारणपणे केळीचा गाभा सहा आठ फूट म्हणजे बर्यापैकी उंच असतो. ह्या
केळीचा खोडाचा हिरवा कोवळा दांडा मात्र अगदी बुटका म्हणजे ना मधेच जमा होता. केळ थेट
जमिनीतून पानं उगवल्यासारखी दिसत होती. तिचा हा तोरा पावसाळ्यापुरता असायचा.
मुंबईच्या धो धो
पावसात धबधब्याखाली भिजणार्या लिरिलच्या जाहिरातीतल्या ओल्याचिंब सुकुमार सुंदरीसारखी
ती दिसायची. पानांवरून ओघळणारे पावसाचे थेंब केसांवरून टपटप पडणार्या जलथेंबांसारखे
सुंदर दिसत. सोसाट्याच्या वार्यात बटा उडाव्यात त्याप्रमाणे तिची पान आनंदात वार्याच्या
दिशेनी स्वतःला झोकून देत मजेत वार्यावर वहात रहायची. पण इतक्या वादळी वार्यात ना
तिची लांबसडक पानं फाटून चिंध्या झाल्या ना केळ उन्मळून पडली. रोज सज्जात उभं राहून
तिला फुटणारं नवीन कोवळं पोपटी पान पाहणे, तिची डेरेदार प्रगती पाहणे आनंददायक असे.
नुसतीच तग धरूनही होती अस नाही तर सर्व संकटांवर मात करत
केळीला केळफुलही आलं काही दिवसात. थोड्याच दिवसात त्या केळफुलातून एक छोटासा केळांचा
लोंगरही तयार झाला. त्या निसरड्या ओल्या सरळसोट खडकावर चढून केळीचा घड काढायचं धाडस
कोणा नरा वा वानरानी केलं नाही . पावसाळा संपला आणि केळीचा लोंगर आणि केळ पिवळी पडून
सुकत सुकत दिसेनाशी झाली. हिरवीगार टेकडुली पिवळी पडली आणि महिन्याभरात काळा कातळ दिसू
लागला. मनातली केळही काही दिवसात हद्दपारही झाली.
पुढच्या वर्षीच्या पावसासोबत ‘सुंदर मी होणार’ म्हणत केळ
परत तरारून आली. तिच्या सोबत शेजारी अजुन एक पिटुकली केळ उगवली होती. आईसोबत नव जग
टुकुटुकु बघत होती. परत तोच चैतन्याचा खेळ सुरू झाला.
पूर्वी पुणे मुंबई
रस्त्यावर घाटात पावसात भिजून चिंब झालेली अशी केळीची झाडं डोंगरांच्या खोबणी खोबणीत,
कडेकपारीत डौलात उभी असायची. त्यांच्या भल्या मोठ्या पानांमुळे आणि पोपटी कोवळ्या रंगाने
ट्रेनमधून जातांनाही डोळ्यात भरायची. बहुधा तिला चविणीची झाडं म्हणत.
ह्याच घाट रस्त्यातून जाताना रापलेल्या तांब्याच्या रंगाच्या,
चवळीच्या शेंगेसारख्या सडसडीत कातकरी तरुणी
डोक्यावर लांबच लांब लाकडांची भलीमोठी लांब मोळी डोक्यावर ठेऊन कडेवर एखादं छोटं बालक
घेऊन तिथले निसरडे चढ उतार सरसर चढून येत आणि झरझर उतरून जाताना दिसत. वाटे ही झाडांची आणि कातकर्यांची जंगलात लहानाची
मोठी होणारी जमात एकसारखीच चिवटपणे, निधड्या छातीने वादळवार्याला तोंड देत आहे.
‘‘फाटणारही नाही कोसळणारही नाही आणि माझा कोमलपणाही सोडणार नाही.’’ ही सकंटाच्या छाताडावर
पाय देत आनंदाने डोलत राहण्याची त्यांची जिद्द, जिजीविषा थक्क करणारी ! कालियाच्या विषारी फण्यांवर नाचणार्या
बाळ-कृष्णासारखी!
नंतर आदिवासी लोकांसोबत काम करणारे एकजण सांगत होते की,
हे कातकरी ह्या रानकेळ्यामधे असलेल्या बीया (रानकेळ्यात जाड मोठ्या बीया असतात.) दुधात
उगाळून नवजात शिशुला देतात त्यामुळे त्यांना कुठली लस घ्यावी लागत नाही. खर खोटं माहित
नाही पण ह्या केळीचा चिवटपणा कातकर्यांनी घेतला का कातकर्यांचा केळीनी न कळे.
बाभळीच्या चिडवण्याला स्वतः जगून उत्तर देणारी ही रानकेळ माझ्या मनात पक्की रुजली खरं!
रानकेळ
पाउस अवखळ वादळखेळ
वार्यापुढती कोण टिकेल
जलधारांचा राक्षसवेल
आकाशातुन झेपावेल ---- 1
जललोंढ्यांचा सुसाट वेग
मधे येईल त्याला खेच
जलभिंतिंनी बांधलि वेस
आकाशातुन खाली थेट ---- 2
तीच तीच ही वादळवेळ
हिरवी मखमल रान फुलेल
डोंगरमाथे कातळ रगेल
निर्झर त्यावरून धावेल ---- 3
काळा कातळ हिरवी केळ
दो रंगांचा सुंदर मेळ
खोबणीतून पत्थरांच्या
उगवेल सुंदर रानकेळ ---- 4
वारा धारा धरून संगत
झिम्मा फुगडी खूप गम्मत
वार्यावरती पसरून पान
आनंदाचे मागे दान ---- 5
फाटकी नसे पान झोळी
पवन,पाउस हवा वादळी
करिती रित्या त्यात ओंजळी
फोफावे ती रोज केळी ---- 6
केळ खेळते रात्रंदिवस
वादळाला बोलून नवस
पहा आली तरारून छान
केळफुलाची खाली मान ---- 7
झाडावरती पिटुक लोंगर
केळांचा राहतो लोंबत
वाढत राहतो रमत गमत
त्याला वादळाची सोबत ---- 8
वार्यावरती देत झोकुन
पावसामधे चिंब भिजून
सांगे बाभळीस गर्जून
सांगते, ऐक कान देऊन ---- 9
तुझ्याहूनही मी वरताण
फाटेल कसं माझं पान
तुला वाटे मृत्यु थैमान
तेच असे मम जीवनभान ---- 10
रानकेळ ही हिरवीगार
वादळवारा पाउस फार
घालून येती हातीहात
माघारीही सारे साथ ---- 11
-------------------
#लेखणीअरुंधतीची-