Wednesday 12 July 2023

वादळ (2)

 

वादळ

कधी कधी पडतच पूर्णपणे वारं

ना फांद्या झोके घेतात ना पानं हलतात

 असतं चिडिचुप सारं सारं

 

निसर्ग उभा असतो पापणीही न हलवता

झडतो का पडतो ह्याची वाट बघत

भीतीने आईला गच्च धरून आाईमागे सरकणार्‍या बाळासारखा

 

पानंही झाडाला धरून

येणार्‍या आाक्रस्ताळ्या वादळाकडे एकटक नजर लावून

मग येतं ते----! कोणालाही न जुमानता

 

मोगली सेनेसारखं बिजलीचे आसूड ओढत

बलात्कार, अत्याचारांची परमसीमा गाठत

किंकाळ्यांची पर्वा न करता फुलांना कुस्करत

 

मधे येईल त्याला टापांखाली चिरडत

आडवा येईल त्याला वार्‍याच्या दाडपट्ट्याने  खाली लोळवत

लपलेल्यांना शोधून त्यांची सालटी काढत

 

खच पडतो पानांचा, फुलांचा, फांद्यांचा

कमरेत वाकलेली झाडं, तुटलेल्या फांद्या

उन्मळून पडलेली झाडं आडवून ठेवतात पुढचे रस्ते

 

सारी रक्तबंबाळ सृष्टी ---कण्हत असते दुःखात चूर

तेवढ्यात विरळ होणार्‍या ढगांमधून

परत एकदा डोकावतो सोनेरी किरणांचा आश्वासक सूर्य

 

पानांच्या पापण्यांमधे अडकलेला अश्रू घेऊन

हसतात मलूल जखमी झाडं

विसरतात, गिळतात कंठात दाटलेले दुःखाचे कढ

 

 ओघळेला अश्रू धरणीही नाही घेत टिपून

खळ खळ वाहणार्‍या  अश्रूंच्या नदीत

जाऊ देते दूर दूर वाहून!

 

 

 

सूर्य फिरवतो त्याचे सोनेरी उबदार हात सर्वांच्या पाठीवरून

परत भरतात जखमा, परत हसतो निसर्ग

पुढच्या वादळाला तोंड द्यायला होतो पुन्हा सज्ज!

--------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment