Friday 21 July 2023

अदखलपात्र!

 

अदखलपात्र!


देवा! नको माझी कविता भव्यदिव्य

नको त्यात गूढ द्व्यर्थीचे सव्यापसव्य

नको तिचं सौंदर्य उलगडून दाखवणारा-

तिच्या आणि वाचकांमधे कोणी ज्ञानी मध्यस्थ

 

नकोच ती ज्ञानाच्या पखाली वाहणारी

एखादी बक्षिसपात्र वा मोठी भारदस्त !

असु देत वळचणीला उगवणार्‍या

दगडी पाल्यासारखी नेमस्त!

 

उखडलेल्या रस्त्यावर लागलीच कोणाला ठेच तर –

लावू देत चुरून त्याचं पान भळभळत्या जखमेवर

उंडारणार्‍या वात्रट मुलानी खुडु देत त्याचं दांडीसकट फूल

 आणि टिचकी मारून उडवत खिदळू दे

‘‘उडवलं रावणाचं डोकं—’’ म्हणत.

 

हवेवर डोलणारा माझा शुभ्र बीजगोल पाहून

हास्याची लकेर उमटु देत कोणा वृद्धाच्या गालावर

निघून गेलेल्या सोनेरी दिवसांची

जाऊ देत खंत मनातून अलगद निसटून हवेवर!

 

कोणी बालिकेने उडवू देत सार्‍या म्हातार्‍या 

फूऽऽ फू करत वार्‍यावर ;

आणि धावू देत त्या पकडण्यासाठी

मनसोक्त इकडे तिकडे माळावर!

 

भिरभिरु दे एखादं फुलपाखरू पिवळं इवलालं

मधाचा एक थेंबुटा घेण्यासाठी आलेलं

झोपु दे पानाची गादी करून सुरवंट एक रात्र

सर्वांना आनंद देऊनही राहू देत माझी कविता ----

अदखलपात्र !

------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 

 

No comments:

Post a Comment