Tuesday 9 May 2023

सरिता `रामाकृती' -

 

सरिता `रामाकृती' -


नदी एक आहे अलौकीक मोठी

तिचे नाम `रामाकृती' हे असेची

नसे निम्नगा ही असे उर्ध्वगामी

सदा नेतसे `सौख्यशृंगी' गिरीसी ।। 1

 

मुखाकाश दाटे सुनीलाकृतींनी

किती दिव्य रामाकृतींनी कृतींनी

मुखी रामनामावली मेघ येता

सुवेगेचि ओथंबुनी थोर जेंव्हा ।। 2

 

सुखे वर्षती नेत्र आनंद धारा

मनाच्या तलावा महापूर येता

 सुखाच्याच लाटांवरी सौख्य धारा

अहा नाचती खेळती पद्मगंधा ।। 3

 

उफाणेचि वेगे जगा सर्व व्यापे

दिसेनाचि रामाकृतीवीण कैसे

सुखाची नदी ना मिळे सागरासी

 स्वये सौख्यसिंधूच `रामाकृती'ही ।। 4

 

मनाच्या तलावी हिचा जन्म झाला

म्हणोनी मना शोधु लागेचि जेंव्हा

मला सापडेना कुठे मीच आता

कुठे बिंदु मी? रामसिंधूच आता ।। 5

 

जसे काष्ठ होई स्वये अग्निरूपी

जळी मीठ का वेगळे राहतेची

तसे विश्व माझे मनाच्यासवेही

विरोनीच `रामाकृती' माजि जाई ।। 6 ।।

---------------------------------------------------------

#लेखणी अरुंधतीची -

 

 

No comments:

Post a Comment