Monday, 31 July 2023

अनवट वाट

 


अनवट वाट

(वृत्त – वसंततिलका)


रानातुनी विहरता मनमुक्त पायी

घालीत शीळचि सुखे तरु वल्लरींसी

 

पक्षीगणांस अनुवादत चालताची

ती रान वाट मजला हळु साद घाली

 

पानातुनी कवडसे पडती रवीचे

वाटे सुरम्य वन सोनसळीच हासे

 

छाया प्रकाश करती नित नृत्य रानी

रानी निसर्ग बरसात करे सुखाची

 

पानेच ही तपकिरी अति शुष्क सारी

सर्वत्र की विखुरली हलके मृदाङ्की

 

मातीस स्पर्श करता मम पावलाने

ती वाजती कुरुकरू गळलीच पाने

 

स्वच्छंद चाल मम ही मन स्वैर धावे

अन्—

ध्यानीमनीहि नसता पथ दोन झाले

 

फाटा अचानक कसा फुटलाच रानी

अज्ञात गूढ पथ दो न कळे दिशाही

 

ओठात शीळ विरली गति पाउलांची

थांबे अचानक पुढे पथ दो बघोनी

 

स्वच्छंद चित्त निरखे पथ गूढ दोन्ही

सारेचि तर्क करुनी, अनुमान बांधी

 

होताच एक पथ तो बहु चाललेला

चालून रुंद तृणहीनचि जाहलेला

 

होता अरुंद हिरवा दुसरा जरासा

वेली तरूत बुडला न कळे कसा हा

 

मी कोणता अनुसरू पथ ना कळेची

पाहून निश्चय मनी परि जाहलाची

 

मी घेतला पथ दुजा सहसा न कोणी

घेई भये; म्हणति दुस्तर ज्या पथासी

 

नाही पुढेच कुणि ना मदतीस पाठी

मी एकली अनुसरे  घनदाट रानी

 

तो मार्ग दुर्गम अतीव असे तरीही

झुंझून मार्ग बनवीतचि चालले मी

 

मागे न मी परतुनी कधि पाहिले ते

पस्तावले न हृदयी मम निर्णयाने

 

तो साहसी पथ क्रमूनचि धन्य झाले

मी वेगळीच जगि ह्या मजला कळाले ----- ।। 8

--------------------------

लेखणी अरुंधतीची –

 

The Road Not Taken 


BY ROBERT FROST

Two roads diverged in a yellow wood,

And sorry I could not travel both

And be one traveler, long I stood

And looked down one as far as I could

To where it bent in the undergrowth;

 

Then took the other, as just as fair,

And having perhaps the better claim,

Because it was grassy and wanted wear;

Though as for that the passing there

Had worn them really about the same,

 

And both that morning equally lay

In leaves no step had trodden black.

Oh, I kept the first for another day!

Yet knowing how way leads on to way,

I doubted if I should ever come back.

 

I shall be telling this with a sigh

Somewhere ages and ages hence:

Two roads diverged in a wood, and I—

I took the one less travelled by,

And that has made all the difference.

.

 

 

 


 

 

Friday, 21 July 2023

अदखलपात्र!

 

अदखलपात्र!


देवा! नको माझी कविता भव्यदिव्य

नको त्यात गूढ द्व्यर्थीचे सव्यापसव्य

नको तिचं सौंदर्य उलगडून दाखवणारा-

तिच्या आणि वाचकांमधे कोणी ज्ञानी मध्यस्थ

 

नकोच ती ज्ञानाच्या पखाली वाहणारी

एखादी बक्षिसपात्र वा मोठी भारदस्त !

असु देत वळचणीला उगवणार्‍या

दगडी पाल्यासारखी नेमस्त!

 

उखडलेल्या रस्त्यावर लागलीच कोणाला ठेच तर –

लावू देत चुरून त्याचं पान भळभळत्या जखमेवर

उंडारणार्‍या वात्रट मुलानी खुडु देत त्याचं दांडीसकट फूल

 आणि टिचकी मारून उडवत खिदळू दे

‘‘उडवलं रावणाचं डोकं—’’ म्हणत.

 

हवेवर डोलणारा माझा शुभ्र बीजगोल पाहून

हास्याची लकेर उमटु देत कोणा वृद्धाच्या गालावर

निघून गेलेल्या सोनेरी दिवसांची

जाऊ देत खंत मनातून अलगद निसटून हवेवर!

 

कोणी बालिकेने उडवू देत सार्‍या म्हातार्‍या 

फूऽऽ फू करत वार्‍यावर ;

आणि धावू देत त्या पकडण्यासाठी

मनसोक्त इकडे तिकडे माळावर!

 

भिरभिरु दे एखादं फुलपाखरू पिवळं इवलालं

मधाचा एक थेंबुटा घेण्यासाठी आलेलं

झोपु दे पानाची गादी करून सुरवंट एक रात्र

सर्वांना आनंद देऊनही राहू देत माझी कविता ----

अदखलपात्र !

------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 

 

Wednesday, 12 July 2023

वादळ (2)

 

वादळ

कधी कधी पडतच पूर्णपणे वारं

ना फांद्या झोके घेतात ना पानं हलतात

 असतं चिडिचुप सारं सारं

 

निसर्ग उभा असतो पापणीही न हलवता

झडतो का पडतो ह्याची वाट बघत

भीतीने आईला गच्च धरून आाईमागे सरकणार्‍या बाळासारखा

 

पानंही झाडाला धरून

येणार्‍या आाक्रस्ताळ्या वादळाकडे एकटक नजर लावून

मग येतं ते----! कोणालाही न जुमानता

 

मोगली सेनेसारखं बिजलीचे आसूड ओढत

बलात्कार, अत्याचारांची परमसीमा गाठत

किंकाळ्यांची पर्वा न करता फुलांना कुस्करत

 

मधे येईल त्याला टापांखाली चिरडत

आडवा येईल त्याला वार्‍याच्या दाडपट्ट्याने  खाली लोळवत

लपलेल्यांना शोधून त्यांची सालटी काढत

 

खच पडतो पानांचा, फुलांचा, फांद्यांचा

कमरेत वाकलेली झाडं, तुटलेल्या फांद्या

उन्मळून पडलेली झाडं आडवून ठेवतात पुढचे रस्ते

 

सारी रक्तबंबाळ सृष्टी ---कण्हत असते दुःखात चूर

तेवढ्यात विरळ होणार्‍या ढगांमधून

परत एकदा डोकावतो सोनेरी किरणांचा आश्वासक सूर्य

 

पानांच्या पापण्यांमधे अडकलेला अश्रू घेऊन

हसतात मलूल जखमी झाडं

विसरतात, गिळतात कंठात दाटलेले दुःखाचे कढ

 

 ओघळेला अश्रू धरणीही नाही घेत टिपून

खळ खळ वाहणार्‍या  अश्रूंच्या नदीत

जाऊ देते दूर दूर वाहून!

 

 

 

सूर्य फिरवतो त्याचे सोनेरी उबदार हात सर्वांच्या पाठीवरून

परत भरतात जखमा, परत हसतो निसर्ग

पुढच्या वादळाला तोंड द्यायला होतो पुन्हा सज्ज!

--------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -