मृगजळ -
सूर्यप्रकाशात सर्व स्वच्छ, छान दिसतं म्हणावं तर जो पर्यंत सूर्य असतो
तोवर वाळवंटात आभासी मृगजळ आपल्याला फसवत राहतं. नसलेल्या जीवनाचे तरंग दाखवत मनात
आशा निर्माण करतं. सूर्याचा प्रकाश सत्याला झाकून टाकतो.
सूर्य
अस्ताला गेला की मृगजळाचा भासही संपतो.
त्याचप्रमाणे संकटात असताना जोपर्यंत माणसाला कुठला ना कुठला आशेचा किरण कोणाच्या तरी रूपात दिसत राहतो तोवर,
तोच आपला जीवन आधार आहे असं समजून ती सुखाची क्षणैक तिरीप मााणूस धरायचा प्रयत्न करतो.
भडक चमचमणार्या वरवरच्या सुखांना प्राप्त करणं हाच पुरुषार्थ समजतो. पण प्रत्यक्ष
अंधारल्यावरच धृवाचा मार्गदर्शक तारा दिसायला लागतो!
सगळ्यांनाच जर हे इंगित कळलं तर जग चालणार कसं? पुष्पदंत म्हणतो, हे
महेशा म्हणूनच
करी ब्रह्मा जेंव्हा जगत नव
निर्माण सगळे
जना -समान्यांच्या हृदि उमटण्या
सम्भ्रम नवे
कधी मूढांनाही हिणकस
कुतर्कांसचि असे
वदाया लावे तो भ्रमित करण्यासी
जगत हे ।।5.3
म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणूस चमचमणारा शिंपलाच चांदी समजून उचलतो.
वाळवंटात पाणी नाही हे माहित असूनही मृगजळामागेच धावत राहतो.
नित्य संकटे मागे कुंती,
परि माझी ना इतुकी भक्ती
मनातली मम विषयासक्ती,
मला देईना जरा सम्मती
‘भूता मिळणे सुख अन शांती’,
एक मागणे संत मागती
मत्सर करतो मनात वस्ती,
इतरांपेक्षा मागे जास्ती
‘व्हावी देवा धृवपद प्राप्ती’
वाटे ऐकुन सुंदर उक्ती
चिकट मुंगळ्यासम परि मन
हे, मागुन घेते राज्यप्राप्ती
‘सैन्य नको मज हवा श्रीहरी’,
पार्थाची प्रार्थना पसंती
अगणित आशा मज ना तृप्ती,
पुन्हा मागते सुखसम्पत्ती
मनी पिपासा रण ओसाडी
, मिळेल जल ना मना शाश्वती
नभी जोवरी असे गभस्ती,
मृगजळ करवी मला भ्रमंती ।।
----------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
1.1.2025.
No comments:
Post a Comment