शिव - शक्ति
रात्र
झाली ही किती अन, थर तमाचे पसरले
पानजाळीतून
खाली, शशि-शकल डोकावते
हालतो
हळु वारियाने, वट-जटा संभार हा
डोलती
ह्या गूढशा अन, पर्ण-सावल्या कशा
भासते
अस्पष्ट काही, वाढवी अस्वस्थता
नभी
नीरव शांतता परि, भासतो गलका कसा
वाहते
जवळून कैसी कोठली जलवाहिनी
जीवनाचा
नाद जाई घन तमाला भेदुनी
सारिपाटचि
मांडला शिव-शक्तिने घाटावरी
शिवा
सम्मुख बैसली ही स्वर्णकांती पार्वती
मोहरा
एकेक सारी, दूर शिव गिरिजापती
धधकत्या
अग्निकुंडी, ना एक उरली सोंगटी
हासुनी बोले उमा ही रात्र शाश्वत ना कधी
हाच
अग्नी सूर्य बनुनी, फुलवेल सृष्टी नवी
स्मित
उमेचे उजळवी ह्या, दशदिशा क्षितिजावरी
सप्तरंग
उधळले नभी, अन विश्व साकारले भुवि
मोहरे
पडलेच जे ते, अमृताने नाहुनी
येउनी
बसले पटी घ्या ऐट त्यांची पाहुनी
‘‘मान्य
करणे प्राणनाथा, हा पराभव आजही’’
अन
उमेच्या त्या स्मिताने, मोहरे शिव आजही
----------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
मार्गशीर्ष आमावास्या डिसें.30, 2024
No comments:
Post a Comment