Tuesday, 31 December 2024

ओढ अनामिक

 

ओढ अनामिक

 

कुणी घेतले, नाम तयाचे, विषया विषयातुनी

सळसळली अन, अंगामधुनी, माझ्या सौदामिनी

 

हुरहुर कसली, लागे मजला, कळे न रात्रंदिनी

चित्र तयाचे, पाहु लागले, मनात रेखाटुनी

 

असेल कैसा, मनास चाळा, बुडले मी चिंतनी

धसमुसळा का, दयार्द्र स्नेहल, प्रतिमेतुन कल्पुनी

 

आलिंगन का, देता त्याने, मिटतिल नेत्र सुखानी

धास्तावुन का, पाहिन त्यासी, डोळे विस्फारुनी

 

खांद्यावरती, हळुच टेकविन, माथा सांभाळुनी

जाइन का मी, मिठीत विरूनी, घेइल का समजुनी

 

हृदयाची का, शमेल धडधड, नेता मज उचलुनी

फरपट का होईल निरंतर, भय-सुसाट वेगानी

 

कधी ओढ तर, कधी भयाने, सरती किती रजनी

कितीक रात्री  निद्रादेवी, गेली मज सोडुनी

 

ओढ अनामिक, मला बोलवे, क्षितिजापार रानी

वाटे ना ही, नगरी परिचित, पाहता मी वळुनी

---------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-


अरुंधतीप्रवीणदीक्षित-

मार्गशीर्ष आमावास्या डिसें.30, 2024

 

शिव - शक्ति

 

शिव - शक्ति


रात्र झाली ही किती अन, थर तमाचे पसरले

पानजाळीतून खाली, शशि-शकल डोकावते

 

हालतो हळु वारियाने, वट-जटा संभार हा

डोलती ह्या गूढशा अन, पर्ण-सावल्या कशा

 

भासते अस्पष्ट काही, वाढवी अस्वस्थता

नभी नीरव शांतता परि, भासतो गलका कसा

 

वाहते जवळून कैसी कोठली जलवाहिनी

जीवनाचा नाद जाई घन तमाला भेदुनी

 

सारिपाटचि मांडला शिव-शक्तिने घाटावरी

शिवा सम्मुख बैसली ही स्वर्णकांती पार्वती

 

मोहरा एकेक सारी, दूर शिव गिरिजापती

धधकत्या अग्निकुंडी, ना एक उरली सोंगटी

 

हासुनी बोले उमा ही रात्र शाश्वत ना कधी

हाच अग्नी सूर्य बनुनी, फुलवेल सृष्टी नवी

 

स्मित उमेचे उजळवी ह्या, दशदिशा क्षितिजावरी

सप्तरंग उधळले नभी, अन विश्व साकारले भुवि

 

मोहरे पडलेच जे ते, अमृताने नाहुनी

येउनी बसले पटी घ्या ऐट त्यांची पाहुनी

 

‘‘मान्य करणे प्राणनाथा, हा पराभव आजही’’

अन उमेच्या त्या स्मिताने, मोहरे शिव आजही

----------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

मार्गशीर्ष आमावास्या डिसें.30, 2024




Tuesday, 5 November 2024

अंबरमणी

अंबरमणी



अंबरमणी

रोज होणारा सूर्योदय, ताम्बूल, महाभारताची कथा वाचन, सुयोग्य पत्नी आणि चांगला मित्र ह्यांची खुमारी दिवसेंदिवस वाढतच जाते. ह्या गोष्टी नित्याच्या  आपल्या नेहमीच्या सहवासात असल्या तरी त्यांची गोडी कधी कमी होत नाही उलट वाढतच जाते. (पंचतंत्रातील दुसरे तंत्र मित्रसंप्राप्ती श्लोक 18)

महाभारत गोष्टीने वा सूर्योदयदर्शने

हितचिंतक पत्नीने। तैसेची तांबुलामुळे

मिळे सन्मित्र भेटीने सुख जे रोज रोज ते

अपूर्व वाटते चित्ता त्याचा उबग ना चि ये ।। 18

सूर्य शिळा होत नाही. सूर्योदयाचा सूर्य कोवळा आहे म्हणून त्याला वाळवीही लागत नाही. सूर्यामुळे, सूर्योदयामुळे सर्वच भूतमात्रांना अपूर्व आनंद मिळत असतो. भारताच्या वेगवेगळ्या भागात ऋतुनुसार सूर्याची पूजा केली जाते. दाक्षिणात्य सूर्याला अभिवादन करण्यासाठी संक्रांत साजरी करतात. आपण रथसप्तमीला उगवत्या सूर्याला चुलीवरच्या  सुगडात/बोळक्यात दूध ओतू घालवून त्याच्याप्रती आदर व्यक्त करतो तर उत्तरेत मोठ्या प्रमाणावर कार्तिक शुद्ध षष्ठीला षट्पूजा करतात.

    इतरवेळीही सूर्य उगवताना दिसला की कोणाचेही हात अपसूक जोडले जातात. सूर्याला अर्घ्य देणे असो, वा सुर्य नमस्कार असो आपलं दैनंदिन जीवन सूर्यासोबत विणलेलं असतं.

रोज झाडांना पाणी घालताना माझ्याकडे पाठ फिरवून, बाल्कनीतून माना बाहेर काढून सूर्याकडे बघत हसणारी डोलणारी झाडं पाहून मोठी गम्मत वाटते. गुलाबाची कळीही बाल्कनीतून शक्य तेवढी मान बाहेर काढून सूर्याच्या दिशेला तोंड करून उमलते. म्हणून सहज मनात आलं,   

नेमाने घालत असते मी, फुलझाडांना पाणी

खताची योग्य मात्रा आणि, किटकनाशकाची फवारणी

मोठ्या श्रमाने ठेवते, मी त्यांची निगराणी

मनीषा एकच असते माझी, यावं बहरून त्यांनी

 

पण मी कुठेच नसते, जणु काही त्याच्या लेखी कोणी

जशी काही मी नसतेच, त्यांची हितचिंतक कोणी

त्यांच्या जवळ असूनही, लक्षच देत नाहीत शहाणी

तूच आम्हाला आणलस घरात, तुझं तूच जाणी

 

पाणी झालं जरा कमी, तर मलुलशा तोंडानी

माना खाली टाकून म्हणतात, दे माय धरणी

कोरड पडली घशाला फार, दे ना गं पाणी

माता आमची धरणी आणि पिता अंबरमणी

 

सूर्याकडेच बघत असतात ती, एकटक नजरेनी

हसतात, सुखावतात ती, सूर्यकिरणांच्या स्पर्शानी

कोंबडीच्या मागे पिलू, ह्याच एका न्यायानी

जिकडे कलेल सूर्य तिकडेच, झुकतात माना वेळावूनी

 

सूर्य भरवतो घास त्यांना, अवनी देते पाणी

डोलत राहतात त्यांच्या कुशीत, झाडे आनंदानी

‘‘तूच आमचा आधारस्तंभ, तूच आमची संजीवनी

तूच आमचा प्राणदाता, अन्नदाता चिंतामणी’’

 

करत असतात नम्रपणे भास्कराची मनधरणी

‘‘तूच धनी, तूच दानी, पंचप्राण संरक्षिणे तूच एकटा जाणी

तुझ्यावाचून होईल सारी वसुंधरा सुनीसुनी

तुझ्यावाचून जगेल कसा पृथ्वीवर कोणी प्राणी?

 

राहो आम्ही समाधानी ह्याची बाळगतोस सावधानी

आमचे चित्त तुझ्या आराधनी राहो नित्य हे दिनमणी 

तूच आहेस जीवनकला तूच आहेस तारिणी

आयुष्य आहे वाहिलेले नारायणा तुझ्या चरणी

 

झाडांना जे कळलं होतं, मला कसं कळलं नाही?

मग मीही म्हणाले जोडून माझी छोटिशी अंजुली

मित्र, रवी, सुर्य भानू, खग, पूषण्, हिरण्यगर्भ

मरीच, आदित्य, सवितृ, अर्क; नमन भास्कराचरणी

---------------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

Wednesday, 10 April 2024

कडुनिंब

कडुनिंब

 

मज दिसे काहिसा, हसरा बालक,  कडुनिंबाच्या रूपे

तो हसे अभावित, हलवित पाने, नित्य निरागसपणे

 

इवली इवली पाने आणिक, इवली इवली फुले

निंब दरवळे मंद मंदसा, आसमंत परिमळे

 

ह्या चांदोबाला दडायलाही, कडुनिंब बहु आवडे

का लपाछपीचा खेळ खेळण्या, सवंगडी हा रुचे

 

पानापानातुनी पवन हा, मासोळीसम पळे

लिंबोळ्यांच्या थेंबुटल्यांचे हलवित गोंडे पिवळे

 

बहु ताना घेई गोड गुलाबी उषःकाली बुलबुल

ह्या निंबावरती झोके घेतचि मधु आनंदे मंजुळ

 

लुटु लुटु हलते झाडावरती निंबोळ्यांची नक्षी

तांबुस वर्णी दिसे पालवी चैत्राची जी साक्षी

 

लडिवाळ सोबती सुंदर झिपरा अंगणी माझ्या गुणी

आनंदाचे निधान माझ्या शरण निदाघा आणी।।

 

--------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

 

 


Wednesday, 28 February 2024

फरक

 

फरक

निष्पर्ण तरूवर एकावेळी । अंकुरती कोब किती ते

ते ताम्र कोंब पालवती सारे । बस आज उद्या फरकाने

 

लसलसती पर्णे, लाल गुलाबी । पोपटीच चमचमणारी

ती नटती हिरव्या गहिर्‍या रंगी । बस आज उद्या फरकानी

 

बहरतोच तरुवर एकावेळी । किति मोहक रंगफुलांनी

उमलत जाती फुले तरूवर । कुणि आधी कुणी नंतरी

 

तो बहर ओसरे एकावेळी । कोमेजति हासरी फुले

झरझर झरती ती झाडापायी । परि आज उद्या फरकाने

 

तरुवरती हळु हळु दिसू लागती । मग घोस फळांचे उमदे

सारे पिकती एकावेळी परि, । पळ आधी नंतर असे

 

बहर संपता परि फुलाफळांचा । दमलेली उरती पाने

क्लांत पर्ण ते विश्रांतिस्तव  । क्षण सोबत बसती सारे

 

जणु कृतार्थतेच्या अपूर्वरंगी । पळ दो पळ खचित निथळती

मग निरोप घेती परस्परांचा । बस आज उद्या फरकानी

 

ती पाने पिवळी लाल मनोहर । निस्तेज क्लांतशी होती

हळु देठ सुटुनिया भिरभिरताती । कुणि आधी कुणी नंतरी

-----------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Tuesday, 6 February 2024

सम्मेलन

सम्मेलन

झाडावरून गळून पडलेल्या पानांचं

एकदा झाडाखालीच सम्मेलन भरलं

कोणाचे देठ, कोणाचा काठ, कोणचं टोक तुटल्याने

कोणीच कोणाला ओळखत नव्हतं

 

परत नव्याने स्वतःची ओळख करून द्यावी

असं  मग सर्वांनुमते ठरलं

आणि सर्वात आधी बोलायला

एक गळलेलं पान उभ राहिलं.

 

‘‘साक्षात सूर्यदेवांच्या स्वागताच्या कमिटिवर

माझं नाव पहिलं होतं.

मला हस्तांदोलन केल्याशिवाय

चंद्रानीही कधि आकाश सोडलं नव्हतं.’’

 

आज मात्र बोलताना ते, बर्‍यापैकी थरथरत होतं

झाडापासून सुटल्याने जरा सैरभैर वागत होतं.

बाकीच्यांच्या आधारनी तेही खाली बसलं.

सार्‍यांनी टाळ्या वाजवत त्याच स्वागत केलं.

 

‘‘माहित आहे, कधी एकेकाळी हे शेंड्यावरचं पान होतं’’

हळुच एक पान दुसर्‍याच्या कानात कुजबुजलं

‘‘तेव्हा त्याने कधी खाली डोकावून आपल्याकडे नाही पाहिलं

आज मात्र तोरा उतरून जमिनीवर आमच्याच सोबत पडलं’’

 

“इश्श्य!” म्हणत मग एक वाळकी पर्णिका बोलु लागली,

माझ्या गुलाबीसर चमकदार रंगांवर दुनिया फिदा होती

शेंड्यावरच्या पानानेही ओळखलं नाही; ती त्याचीच सखी होती

त्याच्याच हातात घालून तीही उत्साहाने सळसळली होती

 

प्रत्येकजण झाडाला मोठं करण्यात झटला होता

शोभा वाढवत झाडाची सारं आयुष्य जगला होता.

नवीन चमकदार पोपटी पालवीने झाड बहरून गेलं होतं

सळसळणार्‍या नूतन पल्लवांना पाचोळ्याशी काहीच देणंघेणं नव्हतं

 

वहिवाटीचा रस्ता झाडाखालूनच जात होता.

येणार्‍या जाणार्‍याच्या पायदळी अनेकांचा चुरा होत होता

थोड्याच दिवसात पानझडीत नव्याने पानं गळणार होती

झाडाखालीच सम्मेलन भरवून आपली यशोगाथा सांगणार होती

--------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

Thursday, 1 February 2024

मोठ्यांची भाषा

 

मोठ्यांची भाषा


कधी कधी ही मोठी माणसं , काहीतरी भलतच बोलतात

असं कसं मला नेहमी, मोठ्या मोठ्या कोड्यात पाडतात

 

आई म्हणते सीताफळं, मोठ्या डोळ्यांचीच चांगली असतात

प्रश्न पडतो मला मग, इतक्या डोळ्यांनी कशी पाहतात?

 

प्रत्येक डोळ्यानी वेगळं पाहून , सरळ चालू शकतील का  

विचारताच मी दटावते आई , डोळे मोठ्ठे करून मला 

 

गुलाबाचा डोळा आबा ,   गांधारीसारखा बांधून ठेवतात.

'' फुटला आता छान'' म्हणत , हळुच त्याची पट्टी सोडतात

 

 चांगल्या डोळ्यावर बांधतात पट्टी, डोळा फुटल्यावर मात्र काढतात का

मोठ्यांचं हे वागणं बोलणं , विपरीत नाही का? तुम्हीच सांगा

 

थंडीने अंगावर आला काटा तर, आई  घालते मला स्वेटर

गुलाबाला बागेमधल्या, मात्र बांधत नाही कधी मफलर

 

जरा नाकाला आलं पाणी तर, आई लावते व्हिक्स बाम

चिक येतो म्हणून काढून टाकते, आंब्याचं तर पुरतच नाक

 

चाफेकळीचं नाक काय , हुंगत बसत त्याचाच सुवास?

विचारलं तर आजी म्हणते, असे प्रश्न कसे सुचतात?

 

आपल्यासारखच ऐकू येतं ,  का हो बाबा गोकर्णाला?

बाबा म्हणतात, बच्चमजी, बसा आता अभ्यासाला

 

लव असलेला भोपळा काकडी । आई म्हणते कोवळे असतात

दूध पीठ लावून बाळा । रोज का मग न्हाऊ घालतात?

 

बाळासारखी चावता मुंगी , अचानक मला जोरात हाती

 ``येत असतील  तिला दात नवे'' , म्हणता खो खो हसते ताई

 

``कसा रे तू गोंड्या माझा'', म्हणत पापा घेते आजी

मोठ्यांची ही वेगळी भाषा, कळत नाही मला कशी?

-------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 


Thursday, 25 January 2024

हे मन्दिर श्रीप्रभु रामाचे

 

हे मन्दिर श्रीप्रभु रामाचे

 

हे मन्दिर श्रीप्रभु रामाचे

हे पाउल एक महत्त्वाचे

सुनिश्चित ध्येय सुपथावरचे

हे स्फूर्तिस्थानचि सर्वांचे ।। 1

 

इतिहासचि उज्ज्वल तो अमुचा

विपरीत करुन जरि सांगितला

रक्तातुन सळसळतो अमुच्या

जाईल पुढेचि पिढ्यानु पिढ्या ।। 2

 

कोदंडधरासी स्मरा स्मरा

ते निर्णय त्याचे अभ्यासा

लावा शास्त्रांचा अर्थ पुन्हा

वेळीच ओळखा खल-खेळ्या ।। 3

 

ते राक्षस निर्दय घोर अती

तैशाच स्त्रिया त्यांच्या असती

लवलेश मनी ना वात्सल्या

ऋषि-रक्तासाठी चटावल्या ।। 4

 

असु देकितीही हीन कृती

करण्या न कधी त्या डगमगती

असुर धाडती पुढतीच स्त्रिया

कारण शास्त्री ना वध्यचि त्या ।। 5

 

गर्जलाच विश्वामित्र तदा

``ह्या स्त्रियाच अनीतिच्या पुतळ्या

अधमास अधम हा धर्म खरा

अपराध घोर ना क्षम्य कुणा ।। 6

 

हा न्याय नसे अन्याय हा

बघतोस कसा क्षत्रीयवरा

उचल धनू शर लाव तया

नीचासी वधणे धर्म तुझा ।। 7

 

संदेह मनि ना धरी जरा

खल स्त्रीही वध्य असे वीरा ’’

ती दुष्ट त्राटिका कोसळता

करि हाहाकारचि खल सेना ।। 8

 

धावली जानकीवर जेव्हा

खाऊन टाकण्या शूर्पणखा

सौमित्र कचरला नाचि जरा

करण्यास कुरुप त्या महिलेला ।। 9

 

``अपहार धनाचा नारीचा

हा असुरधर्म’’ रावण वदला

संहार करुन त्या अधमाचा

सैन्यासह धाडी यमसदना ।। 10

 

ना क्षमा अहिंसा उपयोगी

डसणार्‍या जहरी सर्पासी

जिंकूनही शत्रूसीच क्षमा

हा धर्म न शास्त्री सांगितला  ।। 11

 

हे मन्दिर ना प्रभु रामाचे

प्रभुरामचि येथे अवतरले

कर्तव्य पथावर ना ढळणे

मिळमिळीत अवघे त्याज्य असे ।। 12

 

 

ही हिंदु अस्मिता धगधगती

दृष्टीस दिसे जरि राख वरी

ही फुंकर एक तयावरची

छेडेल तया करि भस्म पुरी ।। 13

 

हे राउळ श्रीप्रभु रामाचे

हे पाउल एक महत्त्वाचे

सुनिश्चित ध्येय सुपथावरचे

हे स्फूर्तिस्थानचि विश्वाचे ।। 14

--------------------------------------

लेखणी अरुंधतीची -