Wednesday, 28 February 2024

फरक

 

फरक

निष्पर्ण तरूवर एकावेळी । अंकुरती कोब किती ते

ते ताम्र कोंब पालवती सारे । बस आज उद्या फरकाने

 

लसलसती पर्णे, लाल गुलाबी । पोपटीच चमचमणारी

ती नटती हिरव्या गहिर्‍या रंगी । बस आज उद्या फरकानी

 

बहरतोच तरुवर एकावेळी । किति मोहक रंगफुलांनी

उमलत जाती फुले तरूवर । कुणि आधी कुणी नंतरी

 

तो बहर ओसरे एकावेळी । कोमेजति हासरी फुले

झरझर झरती ती झाडापायी । परि आज उद्या फरकाने

 

तरुवरती हळु हळु दिसू लागती । मग घोस फळांचे उमदे

सारे पिकती एकावेळी परि, । पळ आधी नंतर असे

 

बहर संपता परि फुलाफळांचा । दमलेली उरती पाने

क्लांत पर्ण ते विश्रांतिस्तव  । क्षण सोबत बसती सारे

 

जणु कृतार्थतेच्या अपूर्वरंगी । पळ दो पळ खचित निथळती

मग निरोप घेती परस्परांचा । बस आज उद्या फरकानी

 

ती पाने पिवळी लाल मनोहर । निस्तेज क्लांतशी होती

हळु देठ सुटुनिया भिरभिरताती । कुणि आधी कुणी नंतरी

-----------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Tuesday, 6 February 2024

सम्मेलन

सम्मेलन

झाडावरून गळून पडलेल्या पानांचं

एकदा झाडाखालीच सम्मेलन भरलं

कोणाचे देठ, कोणाचा काठ, कोणचं टोक तुटल्याने

कोणीच कोणाला ओळखत नव्हतं

 

परत नव्याने स्वतःची ओळख करून द्यावी

असं  मग सर्वांनुमते ठरलं

आणि सर्वात आधी बोलायला

एक गळलेलं पान उभ राहिलं.

 

‘‘साक्षात सूर्यदेवांच्या स्वागताच्या कमिटिवर

माझं नाव पहिलं होतं.

मला हस्तांदोलन केल्याशिवाय

चंद्रानीही कधि आकाश सोडलं नव्हतं.’’

 

आज मात्र बोलताना ते, बर्‍यापैकी थरथरत होतं

झाडापासून सुटल्याने जरा सैरभैर वागत होतं.

बाकीच्यांच्या आधारनी तेही खाली बसलं.

सार्‍यांनी टाळ्या वाजवत त्याच स्वागत केलं.

 

‘‘माहित आहे, कधी एकेकाळी हे शेंड्यावरचं पान होतं’’

हळुच एक पान दुसर्‍याच्या कानात कुजबुजलं

‘‘तेव्हा त्याने कधी खाली डोकावून आपल्याकडे नाही पाहिलं

आज मात्र तोरा उतरून जमिनीवर आमच्याच सोबत पडलं’’

 

“इश्श्य!” म्हणत मग एक वाळकी पर्णिका बोलु लागली,

माझ्या गुलाबीसर चमकदार रंगांवर दुनिया फिदा होती

शेंड्यावरच्या पानानेही ओळखलं नाही; ती त्याचीच सखी होती

त्याच्याच हातात घालून तीही उत्साहाने सळसळली होती

 

प्रत्येकजण झाडाला मोठं करण्यात झटला होता

शोभा वाढवत झाडाची सारं आयुष्य जगला होता.

नवीन चमकदार पोपटी पालवीने झाड बहरून गेलं होतं

सळसळणार्‍या नूतन पल्लवांना पाचोळ्याशी काहीच देणंघेणं नव्हतं

 

वहिवाटीचा रस्ता झाडाखालूनच जात होता.

येणार्‍या जाणार्‍याच्या पायदळी अनेकांचा चुरा होत होता

थोड्याच दिवसात पानझडीत नव्याने पानं गळणार होती

झाडाखालीच सम्मेलन भरवून आपली यशोगाथा सांगणार होती

--------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

Thursday, 1 February 2024

मोठ्यांची भाषा

 

मोठ्यांची भाषा


कधी कधी ही मोठी माणसं , काहीतरी भलतच बोलतात

असं कसं मला नेहमी, मोठ्या मोठ्या कोड्यात पाडतात

 

आई म्हणते सीताफळं, मोठ्या डोळ्यांचीच चांगली असतात

प्रश्न पडतो मला मग, इतक्या डोळ्यांनी कशी पाहतात?

 

प्रत्येक डोळ्यानी वेगळं पाहून , सरळ चालू शकतील का  

विचारताच मी दटावते आई , डोळे मोठ्ठे करून मला 

 

गुलाबाचा डोळा आबा ,   गांधारीसारखा बांधून ठेवतात.

'' फुटला आता छान'' म्हणत , हळुच त्याची पट्टी सोडतात

 

 चांगल्या डोळ्यावर बांधतात पट्टी, डोळा फुटल्यावर मात्र काढतात का

मोठ्यांचं हे वागणं बोलणं , विपरीत नाही का? तुम्हीच सांगा

 

थंडीने अंगावर आला काटा तर, आई  घालते मला स्वेटर

गुलाबाला बागेमधल्या, मात्र बांधत नाही कधी मफलर

 

जरा नाकाला आलं पाणी तर, आई लावते व्हिक्स बाम

चिक येतो म्हणून काढून टाकते, आंब्याचं तर पुरतच नाक

 

चाफेकळीचं नाक काय , हुंगत बसत त्याचाच सुवास?

विचारलं तर आजी म्हणते, असे प्रश्न कसे सुचतात?

 

आपल्यासारखच ऐकू येतं ,  का हो बाबा गोकर्णाला?

बाबा म्हणतात, बच्चमजी, बसा आता अभ्यासाला

 

लव असलेला भोपळा काकडी । आई म्हणते कोवळे असतात

दूध पीठ लावून बाळा । रोज का मग न्हाऊ घालतात?

 

बाळासारखी चावता मुंगी , अचानक मला जोरात हाती

 ``येत असतील  तिला दात नवे'' , म्हणता खो खो हसते ताई

 

``कसा रे तू गोंड्या माझा'', म्हणत पापा घेते आजी

मोठ्यांची ही वेगळी भाषा, कळत नाही मला कशी?

-------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-